राज ठाकरेंनी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन फोडला प्रचाराचा नारळ


पुणे – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पावसामुळे पुण्यात बुधवारी होणारी सभा सभा रद्द झाल्यानंतर कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे. चिरंजीव अमित ठाकरे आणि पुण्यातून विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले सर्व मनसेचे उमेदवार यावेळी त्यांच्यासोबत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बुधवारी जाहीर सभा आयोजित करण्यात केली होती. मनसेचा प्रचाराचा नारळ या सभेच्या माध्यमातून फोडला जाणार होता. मात्र काल सभेच्या दरम्यान मुसळधार झालेल्या पावसामुळे, राज ठाकरे यांना सभा रद्द करण्याची वेळ आली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहण्यास मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा रद्द झाल्याने, आज सकाळी पुणे शहराचे ग्राम दैवत कसबा गणपतीची आरती केली. गणरायाचे दर्शन आणि आरतीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रचाराचा शुभारंभ झाला आहे. यावेळी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि शहरातील मनसेचे उमेदवार देखील उपस्थित होते.

मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील या कसबा विधानसभा मतदार संघातून इच्छुक होत्या. पण शहर अध्यक्ष अजय शिंदे यांना त्यांच्या ऐवजी संधी देण्यात आली होती. त्यामुळे नाराज होत्या आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतल्याचे बोलले जात होते. या सर्व घडामोडी घडत असताना, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कसबा विधानसभा मतदार संघात असलेल्या पुणे शहराचे ग्राम दैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी शहरातील मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र याच मतदार संघातून डावलण्यात आल्याने रूपाली पाटील, यावेळी अनुपस्थिती राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment