स्वस्त झाले स्टेट बँकेचे कर्ज


मुंबई – एमसीएलआरच्या दरात स्टेट बँक ऑफ इंडियाने १० बेसिस पाँईटने कपात केल्यामुळे रेपो दराशी संलग्न नसलेले कर्ज स्वस्त होणार आहे. १० ऑक्टोबरपासून हे कर्जाचे व्याजदर लागू होणार आहेत.

चालू वर्षात सहाव्यांदा देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. एमसीएलआरमध्ये १० बेसिस पाँईटची कपात सणानिमित्त आणि सर्व प्रकारच्या ग्राहकांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी केल्याचे एसबीआयने म्हटले आहे. सर्व प्रकारच्या कर्जाचा यामध्ये समावेश आहे. पण, ही कपात रेपो दराशी संलग्न असलेल्या कर्जाला लागू होणार नाही. एमसीएलआर हा या कपातीनंतर ८.१५ टक्क्यांवरून ८.०५ टक्के होणार आहे. रेपो दरात भारतीय रिझर्व्ह बँकेने २५ बेसिस पाँईटने कपात केल्यानंतर स्टेट बँकेनेही कर्जाचे दर कमी केले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेडिंग रेट्स (एमसीएलआर) ही निश्चित केली पद्धत आहे. याचा वापर करून वाणिज्य बँकांकडून देण्यात येणारे कर्जाचे व्याज ठरविले जातात. बँकांकडून याचा वापर नोटाबंदीनंतर सुरू करण्यात आला. बँकांकडून आकारण्यात येणार कमीत कमी व्याजदर हा आधार दर म्हणून ओळखला जातो. आधार दरावरून बँक एमसीएलआरचा वापर करतात. भांडवलासाठी लागणारा खर्च, बँकांच्या कामकाजाचा खर्च, नफा आदी निकषावरून बँकांकडून व्याजदर निश्चित केला जातो. एमसीएलआरच्या अंमलबजावणीच्या ग्राहकांना फायदा होतो. कारण आरबीआयकडून रेपो दरात कपात झाल्यानंतर बँकांना कर्जाचे व्याजदर कमी करावे लागतात.

Leave a Comment