अल कायदाच्या ‘एक्यूआयएस’ दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याचा खात्मा


इस्लामाबाद – अफगाणिस्तानमध्ये अल कायदा इन इंडियन सबक्वांटिनेंट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याचा खात्मा करण्यात आला आहे. ही कारवाई अमेरिका आणि अफगाण लष्कराने संयुक्तपणे धाड टाकत केली. असिम उमर असे भारतात जन्म झालेल्या या दहशतवाद्याचे नाव होते.

सप्टेंबर २०१४ मध्ये एक्युआयएस या आपल्या शाखेची घोषणा अल-कायदा दहशतवादी संघटनेचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी याने केली होती. ही शाखा भारत, म्यानमार आणि बांग्लादेश या देशांशी लढण्यासाठी सुरु करत असल्याचे त्याने एका व्हिडिओ संदेशात सांगितले होते.

उमरच एक्युआयएसच्या उदयापासून तिचे नेतृत्व करत होता. अमेरिका आणि अफगाण लष्कराने अफगाणिस्तानच्या हेलमंड प्रांतातील तालिबानी तळावर संयुक्तपणे धाड टाकून त्याचा खात्मा केला. आणखी सहा दहशतवाद्यांना त्याच्यासोबत कंठस्नान घातल्याचे सूत्रांकडून समजत आहे. या सहा दहशतवाद्यांपैकी काही पाकिस्तानी असल्याची माहिती मिळत आहे.

अमेरिकेने २०१६ मध्येच उमरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. ६ सप्टेंबर २०१४ला कराचीमधील पाकिस्तानी नौदलाच्या बंदरावर एक्युआयआए दहशतवादी संघटनेने हल्ला करून एका नौदल अधिकाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता.

एक्युआयएसने अमेरिकेचे नागरिक अविजित रॉय, अमेरिकन दूतावासाचे स्थानिक कर्मचारी झुल्हाज मन्नन आणि बांग्लादेशी नागरिक ओयसीकुर रहमान बाबू, अहमद राजीब हैदर आणि एकेएम शफीउल इस्लाम यांच्यासह बांगलादेशातील अनेक कार्यकर्ते आणि लेखकांच्या हत्येची जबाबदारीही घेतली होती.

Leave a Comment