सहा दिवसांत अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टची ‘एवढ्या’ हजार कोटींची उलाढाल


नवी दिल्ली – अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स कंपन्या काही दिवसांपूर्वी सणासुदीनिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या टप्प्यातील सेलमुळे चांगल्याच मालामाल झाल्या आहेत. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या संकेतस्थळांवर 29 सप्टेंबर ते चार ऑक्टोबर दरम्यान विशेष सेलचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही कंपन्यांनी या अवघ्या सहा दिवसांच्या सेलमध्ये तब्बल 19 हजार कोटी रुपयांच्या सामानाची विक्री केली आहे.

यासंदर्भातील आकडेवारी बेंगळुरूची रिसर्च कंपनी रेडसीर कंसल्टंसीने (RedSeer Consultancy) जारी केली असून त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनची भागीदारी सेल दरम्यानच्या सहा दिवसांच्या विक्रीमध्ये तब्बल 90 टक्के होती. यात सर्वाधिक वाटा मोबाइल विक्रीचा होता. विक्री झालेल्या सामानांमध्ये ५५ टक्के विक्री मोबाइलच्या श्रेणीतून झाली. सणासुदीच्या काळातील पहिल्या टप्प्यातील सेलमध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे ऑक्टोबर महिन्यात फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या ऑनलाइन विक्रीचा आकडा 39 हजार कोटी रुपये होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विक्रमी तीन अब्ज डॉलरच्या सामानाची विक्री आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीतही सणासुदीच्या सेलमधील पहिल्या टप्प्यात झाली. यातून ग्राहकांचा ऑनलाइन खरेदीकडे वाढता कल लक्षात येत असून त्याचबरोबर ऑनलाइन खरेदीला ग्राहकांची पसंती असल्याचे हे संकेत आहेत, असे रेडसीर कंसल्टिंगचे संस्थापक आणि सीईओ अनिल कुमार म्हणाले.

Leave a Comment