तेलंगाणाच्या ‘तिरुपती’ला वादाचा अपशकून


दोन्ही तेलुगु राज्यांचे विभाजन झाल्यानंतर तेलंगाणा राज्यात एक उणीव निर्माण झाली होती. ही उणीव होती एका भव्य मंदिराची. याचे कारण म्हणजे जगप्रसिद्ध तिरुपती मंदिर हे आंध्र प्रदेशाच्या वाट्याला गेले. ही उणीव दूर करण्यासाठी तेलंगाणा सरकारने तिरुपतीच्या स्पर्धेत एका मंदिरालाच उभे केले आहे. राज्यातील एका प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येण्यात आहे. त्यातून तिरुपतीला मिळणाऱ्या उत्पन्नाएवढेच उत्पन्न मिळवण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे. परंतु सरकारच्या या उदात्त हेतूला वादाचा डाग लागला आहे.

तेलंगाणातील यादाद्री श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर हे ऐतिहासिक मंदिर आहे. हैद्राबादपासून ते केवळ 60 किलोमीटर दूर असून भुवनगिरी जिल्ह्यात ते आहे. मात्र गेल्या काही काळापासून ते जरासे उपेक्षित राहिले होते. आता त्याला नवे रूपडे देण्यासाठी तेलंगाणा सरकारने 1800 कोटी रुपयांची योजना आखली आहे. त्या अंतर्गत या मंदिराला नवा साज चढवण्यातही आला आहे.

यादाद्री लक्ष्मी-नृसिंह मंदिराचा उल्लेख 18 पुराणांपैकी एक असलेल्या स्कंद पुराणात आहे. हे मंदिर हजारों वर्षे जुने असल्याचे मानले जाते आणि त्याचे क्षेत्रफळ सुमारे 9 एकर एवढे होते. आता त्याच्या विस्तारासाठी 1900 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. मंदिराचे सगळे गोपूर आणि दरवाजे व भिंतीवर लेप करण्यासाठी 39 टन सोने आणि सुमारे 1753 टन चांदी वापरण्यात येणार आहे, यावरून त्याच्या भव्यतेचा आणि थाटामाटाचा अंदाज करता येऊ शकतो. येत्या डिसेंबरमध्ये हे मंदिर तेलंगाणा सरकारला मिळेल, असा अंदाज आहे.

तिरुपती हे तीर्थस्थान पूर्वीच्या एकत्रित आंध्र प्रदेश राज्यात होते. हे तीर्थस्थान बालाजी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तिरुमलाच्या टेकड्यांवर असलेले तिरुपती बालाजी मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरुपती हे शहर हे आंध्राच्या दक्षिण टोकावर असलेल्या चित्तूर जिल्ह्यात आहे. हैद्राबादपासून ते 740 किंमी अंतरावर आहे. मात्र 2014 मध्ये राज्याचे विभाजन झाल्यानंतर ते नव्या आंध्र प्रदेशात गेले आणि तेलंगाणाच्या तिजोरीतील कमाईचा एक मोठा स्रोत कमी झाला. त्यावर तोड म्हणून तेलंगाणातील प्रमुख पर्यटन व तीर्थस्थळ म्हणून यादाद्रीला पुढे आणण्याचा प्रयत्न तेलंगाणा सरकार करत आहे.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यादाद्री मंदिराचे हे विकासकार्य प्रतिष्ठेचे आणि यासंदर्भात आपली योजना राबविण्यासाठी ते मिशन मोडवर काम करीत आहेत, असे तेलंगणा राज्य विधानपरिषदेचे अध्यक्ष गुठा सुखेंदर रेड्डी यांनी गेल्या महिन्यात म्हटले होते. यादाद्री मंदिर हे लवकरच जगातील सर्वोच्च हिंदू मंदिर म्हणून उदयास येईल आणि भाविकांना आकर्षित करेल, असे त्यांनी सांगितले होते. त्यामागे हाच तिरुपतीला पर्याय उभा करण्याचा विचार होता.

मात्र सरकारचा हा प्रयत्न वादापासून दूर राहिला नाही. जीर्णोद्धाराच्या काळात या मंदिराच्या खांबावर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या प्रतिमा कोरण्यात आल्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रतिमांमध्ये केसीआर, इंदिरा गांधी आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचा समावेश होता. तसेच त्यात काही राजकीय चिन्हांचाही वापर करण्यात आला होता.

असे म्हटले जाते, की मंदिराचे महत्त्व व महानता उठून दिसावी, अशी केसीआर यांची इच्छा होती. त्यामुळे मंदिराच्या परिसरात आध्यात्मिक चित्रे कोरलेली असावीत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र झाले भलतेच. तेथील खांबावर त्यांच्या प्रतिमा उमटल्या. केसीआर यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह कार तसेच सायकल, स्कूटर, रिक्षा आणि अगदी क्रिकेट खेळणार्‍या मुलांचा एक गट यांचेही चित्रण त्यात होते.

विरोधी पक्ष काँग्रेस, भाजपा आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी यादाद्री येथे या प्रकाराच्या विरोधात निदर्शने केली. चंद्रशेखर राव स्वत:ला देव म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आणि यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा दावाही त्यांनी केला.

तेव्हा अखेर राव आणि इतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिमा काढून टाकण्यासाठी तेलंगाणा सरकारने यादाद्री मंदिराच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले. मंदिर किंवा इतिहासाशी संबंधित नसलेल्या अन्य सर्व प्रतिमा काढून टाकल्या जातील, अशी ग्वाही राव यांना द्यावी लागली. त्यामुळे हा वाद तात्पुरता शमला असला, तरी हे मंदिर जनतेला पूर्णपणे खुले झाल्यावरच त्याची पूर्ण हकीगत बाहेर येईल.

Leave a Comment