अमेरिकेच्या बदलले व्हिसा नियम, अनेक भारतीयांना बसणार फटका


वॉशिंग्टन – येत्या नोव्हेंबरपासून अमेरिका व्हिसा स्वतःच्या आरोग्याचा खर्च उचलू न शकणाऱ्या किंवा आरोग्याचा विमा नसलेल्या भारतीय नागरिकांना नाकारला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातील निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतला असून, स्थलांतरितांचा अमेरिकेवरील बोजा कमी करण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला असल्याचे म्हणण्यात आले आहे.

जे अमेरिकेत जाण्यासाठी नव्याने व्हिसा मागतील, हा नियम त्यांच्यासाठी लागू असणार आहे. आधीपासून जे स्थलांतरित अमेरिकेत आहेत त्यांना हा नियम तूर्त लागू होणार नाही. त्याचबरोबर अमेरिकेत स्थायिक असलेल्या नागरिकांच्या भारतातून येणाऱ्या नातेवाईकांसाठी हा नियम विशेषत्वाने लागू होणार आहे.

सुमारे २३ हजार भारतीय नागरिकांच्या व्हिसा प्रक्रियेवर अमेरिकी प्रशासनाच्या या नव्या नियमामुळे परिणाम होण्याची शक्यता असल्याचे डोग रँड यांनी म्हटले आहे. आधीच्या ओबामा प्रशासनात रँड हे इमिग्रेशन विभागाचे अधिकारी होती. दरवर्षी भारतातून ३५ हजार नागरिक अमेरिकेतील रहिवाशांचे नातेवाईक या आधारावर तिथे जात असतात. या नव्या नियमाची अंमलबजावणी येत्या ३ नोव्हेंबरपासून होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प या निर्णयानंतर म्हणाले, येथील आरोग्य व्यवस्था या देशात येणाऱ्या स्थलांतरितांच्या बोज्यामुळे कोलमडली नाही पाहिजे. अमेरिकेतील नागरिक भले मोठे कर भरतात. त्यामुळे त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत.

Leave a Comment