निजामांची 300 कोटींची मालमत्ता विकली परस्पर !


मुंबई : तब्बल 300 कोटींची चुना एका बांधकाम व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या दोन माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीला लावला असून याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे निहारिका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने तक्रार दाखल केली आहे. कंपनीच्या मालकीचा हैदराबादमधील एक महलच दोघा माजी कर्मचाऱ्यांनी परस्पर विकून टाकला आहे.

हैदराबाद येथील नजरी बाग पॅलेस हा महल निहारिका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 3 वर्षांपूर्वी नजरी बाग पॅलेस ट्रस्टकडून विकत घेतला होता. 100 वर्षा पूर्वीचा हा पॅलेस आहे. हैदराबादच्या हैदरगुडा परिसरात असलेला हा महल किंग कोठी या नावाने प्रसिद्ध आहे. कंपनीचे कर्मचारी या वर्षी जूनमध्ये जेव्हा हैदराबादच्या मालमत्ता नोंदणी कार्यालायत गेले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण कंपनीने 3 वर्षापूर्वी जो महल विकत घेतला होता, त्याची मालकी आता आयरिस हॉस्पिटॅलिटीकडे गेली होती. संदर्भात चौकशी केली असता आयरिसने सुरेश कुमार आणि सी.रविंद्र यांच्याशी व्यवहार केल्याचे समोर आले. हे दोघेही निहारिकाचे माजी कर्मचारी आहेत. फ्रेब्रुवारी महिन्यात दोघांनी राजीनामा दिला होता.

कंपनीला कोणतीही माहिती न देता सुरेश कुमार आणि सी.रविंद्र यांनी परस्पर काश्मीर येथील आयरिस हॉस्पिटॅलिटीचे मालक अमित अमला आणि अर्जुन अमला यांना 300 कोटींची मालमता विकली. नवी मुंबई आणि मुंबईत निहारिका इन्फ्रास्ट्रक्चरचे अनेक प्रकल्प सुरु आहेत. पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश आणि रविंद्र यांनी मालमत्ता विकताना बनावट कागदपत्रे दाखवली. या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यवहारात हैदराबादच्या एका व्यक्तीने त्यांना मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे.

2.5 लाख एकर एवढ्या मोठ्या जागेवर किंग कोठी पॅलेस ही मालमत्ता पसरलेली आहे. हैदराबाद संस्थान भारतात विलिन होण्याआधी अखेरचे निजाम याच ठिकाणी राहत होते. 1967मध्ये निजामाचा मृत्यू झाला. त्यांनी ही संपत्ती कमाल खान यांच्याकडून विकत घेतली होती. निजामानेच याचे नाव नजरी बागवरून किंग कोठी असे ठेवले होते.

Leave a Comment