आदित्य ठाकरेपेक्षा जास्त श्रीमंत आहेत रोहित पवार


अहमदनगर – काल दिवसभरात जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांनी त्या अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे असलेल्या स्थावर व जंगम संपत्तीची माहिती दिली आहे. उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे बारामतीचे असलेले व नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले रोहित पवार यांच्याकडे 24 कोटी 33 लाखांची संपत्ती आहे.

5 कोटी 62 लाखांची स्थावर मालमत्ता रोहित यांच्याकडे आहे. तर 18 कोटी 50 लाखांची जंगम मालमत्ता आहे. रोहीत यांच्या नावे 11 लाख 92 हजारांची एक गाडी आहे. महागड्या घड्याळांचे ते शौकिन असून, वेगवेगळ्या कंपन्यांची २८ लाखाची ५ घड्याळे त्यांच्याकडे आहेत. 4 कोटी 80 लाखांचे कर्जदेखील त्यांच्यावर आहे.

तर, 7 कोटी 28 लाखांची जंगम आणि 1 कोटी 64 लाखांची स्थावर संपत्ती रोहित यांच्या पत्नी कुंती यांच्याकडे आहे. रोहित यांनी यावर्षीच्या आयकर विवरणपत्रात 3 कोटी 67 लाख 54 हजार रुपये एवढे उत्पन्न दाखवले होते. तर, कुंती यांनी 26 लाख 23 हजार 606 इतके उत्पन्न दाखवले होते.

दरम्यान, कालच आदित्य ठाकरे आणि रोहित पवार या दोघांनी त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरला. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे यावेळी दोघांनीही त्यांच्याकडील स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील सादर केला. आदित्य आणि रोहित यांच्या प्रतिज्ञापत्रांवरील संपत्तीचा तपशील पाहिल्यानंतर रोहित पवार हे आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत असल्याचे समोर आले आहे. 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आदित्य ठाकरेंच्या नावे आहे. आदित्य ठाकरेंनी ते पेशाने व्यावसायिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Leave a Comment