ऐरोलीतून संदीप नाईक ऐवजी गणेश नाईक लढवणार निवडणूक


मुंबई – मुलगा संदीप नाईक याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये आलेल्या गणेश नाईक यांच्यासाठी निवडणुकीतून माघार घेतली आहे. १२५ उमेदवारांची यादी मंगळवारी भाजपने जाहीर केली. पण, गणेश नाईक यांचा या यादीतून पत्ता कट केला. भाजपने ऐरोली मतदारसंघातून त्यांचे सुपूत्र संदीप नाईक यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, संदीप नाईक यांनी उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेल्या वडिलांसाठी माघार घेतली असून, गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढविणार आहे. भाजपने त्यांना एबी फॉर्म दिला देखील दिला आहे.

नवी मुंबईतील ५२ नगरसेवकांसह गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना तेव्हापासून भाजपकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु होती. बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा गणेश नाईकांना सुद्धा होती. पण, भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये नवी मुंबईतील एरोली मतदारसंघातून संदीप नाईक आणि बेलापूर मतदारसंघात पुन्हा आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यामुळे गणेश नाईक यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला.

बुधवारी सकाळी सीबीडी येथील महापौर बंगल्यावर नाराज झालेल्या गणेश नाईक यांनी सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली होती. त्यांचे पुत्र संदीप नाईक, संजीव नाईक आणि त्यांचे समर्थक या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये संदीप नाईक यांच्याऐवजी ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार भाजपने देखील गणेश नाईक यांना ऐरोली मतदार संघातून उमेदवारी दिली असून एबी फॉर्म देखील दिला आहे.

Leave a Comment