‘विमान प्रवासासाठी इम्रान खान यांना मागावी लागते भीक’


नवी दिल्ली: पंतप्रधान इम्रान खान यांच्या विमान प्रवासासाठीही आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानकडे पैसे खर्च करण्याची ऐपत उरली नसल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला.

यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, वित्तीय गैरव्यवस्थापनाचे आपला शेजारी देश हा जिवंत उदाहरण आहे. पाकिस्तान अतिलष्करीकरण आणि चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक डबघाईला आला आहे. पाकिस्तानला अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी काळ्या यादीत टाकले आहे. परिणामी विमानाने आंतरराष्ट्रीय समारंभांना जाण्यासाठी पाकिस्तानी पंतप्रधानांना पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. इम्रान खान आणि पाकिस्तानचे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला हजेरी लावण्यासाठी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत आले होते. इम्रान खान यांनी त्यावेळी सौदीच्या राजपूत्राचे विशेष विमान वापरले होते, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला काळ्या यादीत एशिया पॅसिफिक समूहाच्या अर्थविषयक कृती समितीने (फायनान्शियल एक्शन टास्क फोर्स) टाकले होते. पाकिस्तानला दहशतवादी संघटनांना मिळणारी आर्थिक रसद रोखण्याचे आदेश ‘एफएटीएफ’ने दिले होते. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी झाली होती. सध्याच्या घडीला पाकिस्तानमधील जीवनावश्यक गोष्टींच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत.

Leave a Comment