राष्ट्रवादीला दिलासा, पण महाराष्ट्रात नव्हे…


महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 नेत्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोंधळ माजला असून घडामोडींना वेगल आला आहे. त्यातच अजित पवार यांनी

अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचा पाय खोलात जात असल्याचे वाटत असतानाच या पक्षाला दिलासा देणारी एक बातमी आली आहे. पण ती महाराष्ट्रातील नव्हे, तर केरळमधून आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मणि सी. कप्पेन यांनी पाला विधानसभा मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. गेली चार दशके हा मतदारसंघ केरळ कॉंग्रेस (एम) या पक्षाच्या ताब्यात होता. तेथे एलडीएफला चाळीस वर्षांत पहिल्यांदाच विजय मिळाला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) या आघाडीतील हा तिसरा मोठा पक्ष आहे.

त्यांच्या या विजयामुळे सत्ताधारी डाव्या पक्षांच्या शिबिरात काहीसे उल्हासाचे वातावरण निर्माण झाले नसते तरच नवल. कारण केवळ चार महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या (माकप) नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीला (एलडीएफ) दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी राज्यातील 20 पैकी 19 जागा यूडीएफने जिंकल्या होत्या. त्यामुळे या विजयामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलले असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

अर्थात ही लढत अटीतटीची झाली. कप्पेन यांनी यूडीएफचे उमेदवार टॉम पुलिक्कुनेल यांनी यांचा केवळ 2,943 मतांनी पराभव केला.
पाला मतदारसंघात एलडीएफने अखेरचा विजय 1980 मध्ये मिळवला होता. त्यावेळी केरळ काँग्रेस (एम) पक्षाचे संस्थापक के. एम. मणी यांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एलडीएफमध्ये प्रवेश केला होता. के.एम. मणी यांनी 1967 पासून सतत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. यावर्षी एप्रिलमध्ये त्यांचे निधन झाल्याने ही पोटनिवडणूक झाली.

केरळमध्ये आणखी पाच विधानसभा मतदारसंघात येत्या 21 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी करत असताना एलडीएफला कप्पेन यांच्या विजयामुळे मोठा आधार मिळणार आहे.

पुंजारचे आमदार पी.सी. जॉर्ज यांच्या नेतृत्वात एका गटाने एनडीएशी युती केली होती. त्यामुळे पाला मतदारसंघात भाजप उत्तम कामगिरी करेल, अशी राजकीय निरीक्षकांची अपेक्षा होती. मात्र लोकसभेप्रमाणेच याही निवडणुकीत भाजपची कामगिरी सुमार झाली. भाजपच्या मतांच्या टक्केवारीत घट होणे हा एलडीएफच्या उमेदवाराच्या विजयामागील प्रमुख घटक मानल्या जात आहे. के.सी. (एम) चे उमेदवार आणि यूडीएफच्या काही नेत्यांनी एलडीएफ नेत्यावंर स्थानिक भाजप नेतृत्वाशी साटेलोटे आरोप केला. एलडीएफने मात्र हा आरोप फेटाळून लावला. भाजपकडून निराश झाल्यामुळे भाजप आमच्या उमेदवाराला मतदान केले, असे माकपचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री के. सुधाकरन यांनी पत्रकारांना सांगितले.

मणि सी कप्पेन हे केरळमध्ये चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. यापूर्वी के. एम. मणी यांनी त्यांचा चारदा पराभव केला होता. स्वातंत्र्यसैनिक आणि माजी खासदार चेरियन जे. कप्पेन यांचे ते चिरंजीव आहेत. मल्याळम सिनेसृष्टीतील एक वजनदार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी सुमारे दहा चित्रपटांची निर्मिती केली असून सुमारे दोन डझन चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांच्या नावावर दोन चित्रपट आहेत. ते 1980च्या काळात आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटूही होते.

केरळमध्ये सध्या डावी आघाडी सत्ताधारी असून या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा एक घटक पक्ष आहे. राज्यात 2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाटय़ाला चार जागा आल्या होत्या. त्यापैकी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आले होते. कुट्टनाड मतदारसंघातून थॉमस चंडी तर इथलूर मतदारसंघातून शशिंद्रन हे दोघे विजयी झाले होते. त्यात आता कप्पेन यांच्या रूपाने आणखी एकाची भर पडली आहे. त्यामुळे आपल्या मूळ राज्यात राष्ट्रवादीची नौका डगमगत असली, तरी सर्वच काही संपलेले नाही. कुठे का होईना राष्ट्रवादीला आनंदीत होण्याजोगी परिस्थिती आहे.

Leave a Comment