
नवी दिल्ली – आयकर परतावा भरण्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) घेतला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने गुरूवारी याबाबतची माहिती दिली आहे. एक महिन्याची मुदतवाढ आयकर परतावा भरण्यासाठी देण्यात आली असून 31 ऑक्टोबरपर्यंत आता आयकर परतावा भरता येणार आहे.
आता 31 ऑक्टोबरपर्यंत भरता येणार आयकर परतावा
केवळ ज्यांच्या आयकर खात्यांसाठी लेखापरीक्षणाची आवश्यकता आहे अशानाच ही मुदतवाद देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर मुदतवाढ केवळ आयकर परतावाच नाही तर टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्यासाठीही देण्यात आली आहे. यापूर्वी 30 सप्टेंबर टॅक्स ऑडिट रिपोर्ट जमा करण्याची अंतिम तारीख होती. आता ती देखील वाढवून 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे.
ही मुदतवाढ आयकर कायद्याच्या कलम 44 एबी अंतर्गत ज्या कंपन्यांच्या आयकर परताव्याचे परीक्षण केले जाते त्याच कंपन्यांना लागू होणार आहे. या कंपन्यांच्या खात्यांचा परतावा दाखल करण्यापूर्वी त्यांचे लेखापरीक्षण होणे आवश्यक असते.
