अखेर भाजपला काँग्रेसमध्ये ‘प्रतिस्पर्धी’ सापडला!


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. मात्र पितृ पंधरवड्यामुळे अद्याप राजकीय हालचाली सुरू झालेल्या नाहीत. तोपर्यंत राजकीय पक्ष एकमेकांवर तोंडसुख घेऊनच वेळ काढत आहेत. या संदर्भात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या पक्षाचे नेते शरद पवार यांनाच लक्ष्य केले होते. माजी सत्ताधारी काँग्रेस या लढाईत खिजगणतीतही नसल्यासारखी परिस्थिती होती. परंतु माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधत भाजपने काँग्रेसवर हल्ला करण्याचा श्रीगणेशा केला आहे.

अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. आता आपली उरलीसुरली पत वाचवण्यासाठी त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवू नये. राज्यात कुठल्याही मतदारसंघात उभे राहिले तरी अशोक चव्हाण पराभूत होतील, असा टोमणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नांदेड येथे मारला. अर्थात त्याला प्रत्युत्तर देण्यात चव्हाणही मागे राहिले नाहीत.

विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्या वतीने राज्यात सात विभागीय केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. तावडे यांनी मंगळवारी नांदेड व औरंगाबाद येथील विभागीय माध्यम केंद्रांना भेट दिली आणि त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नांदेड येथे त्यांनी अशोकरावांवर शरसंधान केले.
नांदेड हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला. येथून त्यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लीलया जिंकल्या आहेत. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचा अनपेक्षित पराभव केला. त्यामुळे भाजपच्या तंबूत उत्साहाचे वातावरण आहे. त्याचेच प्रतिबिंब तावडे यांच्या वक्तव्यात पडले आहे.

“राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांची त्यांच्याच जिल्ह्यात वाताहत झाली. आता त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवू नये आणि आपली उरली सुरली पत घालवू नये, असा सल्ला आपण देत आहोत,” असे तावडे म्हणाले. अशोक चव्हाण हे राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी कुठल्याही मतदारसंघात उभे राहिले, तरी ते पराभूतच होतील, असे भाकीतही त्यांनी केले.

अर्थात भाजपच्या नेत्यांची ही टीका सहजासहजी पचवणारे नेत्यांपैकी चव्हाण नाही. माझ्याविरोधात लढण्यासाठी निष्ठावंतांना सोडून उमेदवाराची आयात करणाऱ्या भाजपने मला फुकटचा सल्ला देऊ नये, अशा या शब्दांत त्यांनी तावडे यांच्या टीकेची परतफेड केली.

“ भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवतो. पण भाजपला काँग्रेसविरूद्ध लढण्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते मिळत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारने उत्तम काम केल्याचा दावा भाजप करते. मात्र त्या कामाच्या बळावर आपले निष्ठावान कार्यकर्ते निवडणूक रिंगणात उतरविण्याऐवजी भाजपला उमेदवारांची पळवापळवी करावी लागते, याची तावडे यांनी अधिक काळजी केली पाहिजे. काँग्रेसने कोणाला उमेदवारी द्यावी, हा काँग्रेसचा प्रश्न आहे. विनोद तावडे यांनी त्यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. त्यापेक्षा त्यांनी भाजपमध्ये होणाऱ्या बंडाळीवर लक्ष दिले पाहिजे,” असे ते म्हणाले.

या दोन नेत्यांतील वादांची योग्यायोग्यता एकीकडे, परंतु या निमित्ताने भाजपने काँग्रेस नेत्यांना लढाईच्या रिंगणात घेतल्याचे चित्र निर्माण झाले एवढे नक्की. याचे कारण म्हणजे काँग्रेसचे आव्हान गांभीर्याने घ्यायलाच भाजप तयार नाही.

खुद्द काँग्रेस नेत्यांनाही याची जाणीव होती. म्हणूनच “काँग्रेसने अनेक चढउतार पाहिले आहेत, परंतु आगामी काळात नव्या जुन्यांचा मेळ घालत काँग्रेस पक्ष पुन्हा जोमाने उभा राहील,” असा आशावाद काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना दोन महिन्यांपूर्वी व्यक्त करावा लागला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा गेल्या महिन्यात नांदेड येथेच गेली होती. त्यावेळी “ज्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणून हिणवले तेच बी टीम होऊ लागले असून वंचित बहुजन आघाडी ए टीम होउ लागली आहे. आपल्याला असे दिसते की, आगामी विधानसभेत वंचित बहुजन आघाडी हाच प्रमुख विरोधी पक्ष ठरेल आणि विरोधी पक्षनेता त्यांचाच असेल,” अशी जबरदस्त टीका फडणवीस यांनी केली होती.

भाजपचे सर्व लक्ष आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार यांच्यावर केंद्रीत झाले होते. अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे नेते असतानाही काँग्रेसला फारसे स्थान सत्ताधाऱ्यांनी दिलेच नव्हते. ते चित्र तावडे यांच्या टीकेमुळे बदलायला हरकत नाही.

Leave a Comment