कोकणातील दशावतारी कलावंताची कथा दिसणार ‘पिकासो’तून


लवकरच ‘पिकासो’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता प्रसाद ओक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोकणातील दशावतारी कलावंताची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील राष्ट्रीय पुरस्कार विजेता असलेल्या प्रसादचा फर्स्ट लूकदेखील नुकताच रिलीज करण्यात आला आहे. दशावतारातील प्रसादची मोहक छबी पाहून प्रेक्षकांची उत्कंठा कमालीची शिगेला पोहचली आहे. चित्रपटातील त्याची नेमकी भूमिका कशी असणार, याबद्दलही कुतूहल निर्माण झाले आहे.

या चित्रपटाची निर्मिती ‘बुटीक फिल्म स्टुडिओ’आणि ‘प्लॅटून वन फिल्म्स’यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. अमराठी युवा निर्माते शिलादित्य बोरा यांची ही पहिलीच निर्मिती आहे. ‘कोर्ट’ या बहुचर्चित तसेच लोकप्रिय चित्रपटाच्या वितरण व मार्केटिंगचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

अभिजीत मोहन वारंग यांनी या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन केले आहे. त्यांचाही हा पहिलाच चित्रपट आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट जगभरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘१० व्या जागरण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आणि ‘७व्या ब्रह्मपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल’ करिता निवडला गेला आहे. मुंबईत २८ सप्टेंबर रोजी ‘जागरण फिल्म फेस्टिव्हल’ तर २९ सप्टेंबर रोजी ‘ब्रम्हपुत्र व्हॅली फिल्म फेस्टिव्हल’, गुवाहाटी येथे या चित्रपटाचे विशेष खेळ होणार आहेत.

तळ कोकणातील वालावल येथील लक्ष्मी – नारायण या पौराणिक मंदिरात दशावतार या लोककलेचा इतिहास व त्याविषयीचे दस्तऐवज उपलब्ध आहे. या लोककलेवर बेतलेला ‘पिकासो’ हा एकमेव चित्रपट आहे. विशेष म्हणजे त्याचे चित्रीकरणही याच मंदिरात करण्यात आले आहे. ८०० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास या लोककलेला आहे. दशावतारी कलावंतांनी राजाश्रय आणि सरकारी अनुदानाशिवाय ही लोककला जिवंत ठेवण्याचे कसब जोपासले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. या कलेवर ३ लाख ५० हजार दशावतारी कलावंतांची उपजीविका असूनही या कलावंतांच्या तसेच या लोककलेच्या विकासासाठी सरकारने विशेष प्रयत्न केल्याचे दिसत नाहीत. ‘आजतागायत या दशावतारी कलेसाठी प्रचंड आर्थिक संघर्ष करून, आपले कर्तव्य समजून तिला जिवंत ठेवण्याचे कार्य करणाऱ्या अगणित दशावतारी हयात व दिवंगत कलावंत, गायक यांना हा चित्रपट आम्ही समर्पित करीत आहोत, असे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी सांगितले आहे.

Leave a Comment