भारत आणि पाकिस्तानने मिळूनच काश्मीर मुद्दा सोडवायला हवा – ट्रम्प


न्युयॉर्क – काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. पुन्हा एकदा काश्मीर मुद्द्यावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मागत फिरणाऱ्या पाकिस्तानला तोंडघशी पडण्याची वेळ आली. भारत आणि पाकिस्तानने मिळूनच काश्मीर मुद्दा सोडवायला हवा, तसेच आपले भारतासोबत मैत्रीपूर्ण संबध असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

भारत पाकिस्तान काश्मीर मुद्द्यावर नक्कीच बरोबर येतील. जर भारत पाकिस्तान दोन्ही देश तयार असतील तरच काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास आपण तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले. हा एक क्लिष्ट प्रश्न असून दोघांनाही यावर चर्चा करावी लागेल, असे ट्रम्प म्हणाले.

चागंल्या प्रकारे मध्यस्थी मी करु शकतो. पण, आधी दोन्ही देश त्यासाठी चर्चेसाठी तयार हवे, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी याआधीही अनेक वेळा काश्मीरप्रश्नी भारत-पाकिस्तानशी मध्यस्थी करण्याबाबत वक्तव्य केले आहे, पण काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून अमेरिकेने मध्यस्थी करण्याची गरज नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच जरी या प्रश्नी चर्चेची गरज पडली तरी ती फक्त पाकिस्तानशी केली जाईल, असेही भारताने स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांनी इम्रान यांच्या बरोबर झालेल्या भेटीदरम्यानच हाऊडी मोदी कार्यक्रमाची प्रशंसा केली. तसेच एका पाकिस्तानी पत्रकाराने काश्मीरमधील मानवाधिकार उल्लघंनाबाबात प्रश्न विचारला असता ट्रम्प भडकले, असले पत्रकार तुम्ही कोठून शोधून आणता, असे ट्रम्प म्हणाले.

Leave a Comment