अमरावतीच्या करोडपती बबिता ताडेंच्या खात्यात जमा होणार इतकी रक्कम


अमरावतीच्या बबिता ताडे यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती 11’ मध्ये कोट्याधीश होण्याचा मान मिळवला. पण बबिता ताडे खरोखरच कोट्याधीश झाल्या आहेत का? नेमकी किती रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

सगळ्यांनाच कोट्याधीश झालेल्या बबिता ताडे यांच्या बँक खात्यात नेमके किती रुपये जमा झाले याची उत्सुकता असेल. याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही अनेकांनी गुगल, यूट्यूबवर केला असेल. मात्र याचे उत्तर आता समोर आले आहे.

जिंकलेल्या एक कोटी रुपयांवर ताडे यांना 33 टक्के टॅक्स भरावा लागेल. त्यामुळे बबिता ताडेंच्या बँक खात्यात जवळपास 67 लाख रुपये जमा होतील. ही रक्कम संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन महिन्यांनी अकाऊंटमध्ये जमा होणार आहे. कितीही रक्कम केबीसीमध्ये जिंकली तरी 33 टक्के कर सरकारकडे जमा करावाच लागतो. म्हणजे एक कोटी रुपये जिंकल्यावर 33 लाखांचा कर भरावा लागतो, तर दहा हजार जिंकल्यावरही 3 हजार 300 रुपये टॅक्स भरुन केवळ 6 हजार 700 रुपयांवर समाधान मानावे लागते.

एक एक टप्पा पार करत बबिता यांनी एक कोटी रुपये जिंकले. एक कोटी रुपये जिंकल्यानंतर बबिता ताडेंना सात कोटींचा प्रश्नही विचारण्यात आला होता. पण खेळ तिथेच थांबवण्याचा निर्णय त्यांनी घेत एक कोटी रुपयांमध्ये समाधान मानले.

जेव्हा बिग बींनी एक कोटी रुपये जिंकल्यावर काय करणार, असा प्रश्न विचारला, तेव्हा बबिता ताडेंनी अगदी भाबडेपणाने मोबाईल फोन घेईन, असे उत्तर दिले. घरात एकच मोबाईल असून तो सर्व जण वापरतात. त्यामुळे आपल्याला वैयक्तिक मोबाईल असावा, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती.

बबिता ताडेंना विचारण्यात आलेला एक कोटींचा प्रश्न
मुघल शासक बहादुर शाह जफरच्या दरबारातील कोणत्या कवीने ‘दास्तान ए गदर’ नावाने वैयक्तिक विचार मांडले होते?
A) मीर तकी मीर B) मो इब्राहिम जौक C) जहीर देहलवी D) अबुल क्वाशिम फिरदौशी
उत्तर – C) जहीर देहलवी

बबिता ताडेंना विचारण्यात आलेला सात कोटींचा प्रश्न
पुढीलपैकी कोणत्या राज्यातील सर्वाधिक राज्यपाल नंतर राष्ट्रपती झाले?
A) राजस्थान B) बिहार C) पंजाब D) आंध्रप्रदेश
उत्तर – B) बिहार

Leave a Comment