या गड्याने ७११ कोटींच्या वसूलीसाठी फोडल्या २० गाड्या


अमेरिकेतील फ्लोरिडा येथे एक आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. तेथील एका व्यक्तीने रस्त्यावरील गाड्यांची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर्जाचा दावा करत तोडफोड केली आहे. तब्बल ३० हजार अमेरिकी डॉलरचे यात नुकसान झाले आहे. ‘जस्टिन जेम्स विल्सन’ असे खळखट्याक करणाऱ्या या ३० वर्षीय गुन्हेगाराचे नाव आहे. एकूण २० गाड्यांचे नुकसान रस्त्यावर गाणे गाऊन उदरनिर्वाह करणाऱ्या जस्टिनने केले आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलीस चौकशी दरम्यान त्याने गुन्हा मान्य केला. पण त्याने याबाबत दिलेले कारण मात्र चक्रावून टाकणारे आहे. त्याच्याकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल एक ट्रिलीयन डॉलरचे ( ७११ कोटी ९७ लाख रुपये ) कर्ज घेतले होते. त्यांनी ते कर्ज अनेक प्रयत्न करुनही परत केले नाही. परिणामी आर्थिक टंचाईमुळे तो बेघर झाला. शेवटी या घटनेचा बदला घेण्यासाठी त्याने या गाड्या फोडल्याचा दावा जेम्सने केला आहे.

पोलिसांसाठी जेम्सने केलेला दावा हास्यास्पद असला, तरी देखील या प्रकारामुळे ते चांगलेच कचाट्यात अडकले आहेत. जेम्स अत्यंत गरीब व अनाथ आहे. त्याला दोन वेळच्या जेवणासाठी रस्त्यावर भीक मागावी लागते. त्याने अशा परिस्थित २० लाख रुपयांचे नुकसान केले. गाड्यांच्या मालकांना त्यांच्या नुकसानीची भरपाई हवी आहे. दरम्यान विमा कंपन्यांनी देखील अशा प्रकारची भरपाई त्यांच्या नियमात बसत नसल्यामुळे पैसे देण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थित गाड्यांच्या मालकांना नुकसान भरपाई द्यायची कशी हा पेच पोलिसांसमोर पडलेला आहे.

Leave a Comment