तिहार तुरुंगात पी चिदंबरम यांच्या भेटीला मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी


नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची तिहार तुरुगांत जाऊन माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेऊन विचारपूस केली. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनीही त्याआधी पी चिदंबरम यांची भेट घेतली. पी. चिदंबरम यांना 21 ऑगस्टला ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची 5 सप्टेंबरला तिहार तुरुगांत रवानगी करण्यात आली.

चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी दिल्लीतील न्यायालयाने 19 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. पी. चिदंबरम यांच्यावरून भाजप सातत्याने काँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. त्यानंतर काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी चिदंबरम यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी ही भेट काँग्रेस पी. चिदंबरम यांच्या पाठीशी उभी असल्याचा संदेश देण्यासाठी घेतल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि गुलाम नबी आझाद यांनीही तिहार तुरुंगात जाऊन चिदंबरम यांची भेट घेतली होती. चिदंबरम यांच्यावर भाजपने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस करत आहे.

पी चिदंबरम यांची मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी भेट घेतल्याबद्दल आणि पाठबळ दिल्याबद्दल कार्ती चिदंबरम यांनी त्यांचे आभार मानले. या राजकीय लढाई यामुळे आम्हाला ताकद मिळेल, असेही त्यांनी म्हटले.

Leave a Comment