बुंदेलखंडातील रहस्यमयी कालींजर किल्ला


भारत पर्यटनासाठी अनेक परदेशी लोकांची पहिली पसंती आहे. भारतात आजही अनेक रहस्यमय गुढ अशी अनेक ठिकाणे आहेत आणि त्याची रहस्ये आजही कायम आहेत. बुंदेलखंडातील कालींजर किल्ला हे असेच एक गुढ ठिकाण. १० व्या शतकात या किल्ल्यावर चंदेल राजपूत व नंतर रीवा सोलंकी राजघराण्याचा ताबा होता. या किल्लावर महम्मद गझनी, कुतुबुद्दीन ऐबक, शेर शाह सुरी, हुमायून यांनी आक्रमणे केली पण त्यांना विजय मिळविता आला नाही. याच किल्ल्यावरील तोफेचा गोळा लागून शेरशाह मरण पावला आणि त्याच्या हातातून विजय निसटला.

त्यानंतर सम्राट अकबर याने मात्र हा किल्ला ताब्यात घेतला आणि तो त्याच्या नवरत्न मंत्रिमंडळातील अतिशय बुद्धिमान आणि चाणाक्ष मंत्री बिरबल याला भेट म्हणून दिला असे उल्लेख येतात. या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे असून त्यातील काही तिसऱ्या आणि पाचव्या शतकातील आहेत. ही मंदिरे गुप्तकालीन असल्याचे सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार देव आणि दानव यांनी अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातुन निघालेले कालकूट हे हलाहल विष महादेवाने प्राशन केले आणि त्यानंतर या ठिकाणी तपस्या करून शरीराचा दाह शांत केला होता. या शिवमंदिराला नीलकंठ महादेव मंदिर असे म्हटले जाते.

या परिसरात उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असते. पण नीलकंठ महादेव मंदिराच्यावर उन्हाळ्यात सुद्धा पाण्याचा एक नैसर्गिक प्रवाह सतत वाहत असतो आणि या महादेवाला या पाण्याचा अभिषेक होत असतो.

कालींजर किल्ला अनेक रहस्यानी भरलेला आहे. येथे अनेक लहान मोठ्या गुहा आहेत. प्रवेशासाठी सात दरवाजे आहेत आणि ते एकमेकांपेक्षा पूर्ण वेगळे आहेत. किल्ल्याचे खांब आणि भिंतींवर अनेक गुढ लिप्या कोरलेल्या असून या किल्लात मोठा गुप्त खजिना असल्याचे सांगितले जाते. मात्र ज्यांनी कुणी हा खजिना शोधण्याचा प्रयत्न केला ते जिवंत राहिले नाहीत. हा किल्ला ८०० फुट उंचीच्या पहाडावर आहे. दिवसा तो अगदी शांत तर रात्री भीषण वाटतो.

स्थानिक सांगतात. या किल्लाजवळ राणी महाल असून रात्री तेथून घुंगराचे आवाज येतात. किल्ल्यात सीता शेज नावाची छोटीशी गुहा असून तेथे दगडी पलंग आणि तक्क्या आहे. हे सीतामाईचे विश्रांतीस्थान होते असाही समज आहे.

Leave a Comment