डायटवर असूनही आहारामध्ये भात असा करा समाविष्ट

Rice
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अनेकांच्या आहारातून भात संपूर्णपणे वर्ज्य असल्याचे दिसून येते. यामागे मुख्य कारण, भात आहारामध्ये असण्याबाबत मनामध्ये असलेले गैरसमज किंवा अपुरी माहिती हे असू शकते. भातामध्ये स्टार्च मोठ्या प्रमाणवर असून, कॅलरीजने परिपूर्ण असा हा पदार्थ असल्याने अनेकांनी आपल्या आहारातून हा पदार्थ संपूर्ण वर्ज्य केल्याचे पहावयास मिळते. पण या पदार्थाची विशेषता अशी, की हा पदार्थ बहुतेक प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध असून, हा पदार्थ झटपट तयार होणारा आहे. तसेच हा पदार्थ निरनिराळ्या प्रकारे ही तयार करता येतो. त्यामुळेच भात बहुतेकांच्या आवडीचा असला, तरीही वजन घटविण्याच्या उद्देशाने हा पदार्थ आपण आहारातून वर्ज्य केलेला असतो.
Rice2
पण आहारतज्ञांच्या मते, वजन घटविण्यासाठी जर आपण डायट पाळत असू, तर त्यातून भात संपूर्ण वर्ज्य करण्याची आवश्यकता नाही. त्या ऐवजी आपण सेवन करीत असलेल्या भाताचे प्रमाण जर नियंत्रित असले, आणि संतुलित आहाराच्या जोडीला नियमित व्यायामाची जोड दिली, तर वजन घटविण्यासाठी आपल्या आवडत्या पदार्थाला आहारातून वर्ज्य करण्याची गरज पडत नाही.
Rice1
भातामध्ये स्निग्ध पदार्थ (fats) कमी असून, हा सहज पचणारा पदार्थ आहे. यामध्ये ग्लुटेन नसून, ‘ब’ जीवनसत्वे यामध्ये मोठ्या मात्रेत आहेत. त्यामुळे आपले डायट सांभाळताना हा पदार्थ देखील मर्यादित मात्रेमध्ये आपल्या आहारामध्ये जरूर समाविष्ट करावा. आपण दिवसातून तीन वेळा भोजन घेत असाल, तर त्यातील एकाच भोजनामध्ये भात, मर्यादित प्रमाणामध्ये सेवन करावा. तसेच ज्या भोजनामध्ये भात घ्यायचा असेल, त्या भोजनापूर्वी आणि त्यानंतर कर्बोदके युक्त इतर पदार्थांचे सेवन टाळावे. भोजनामध्ये केवळ भातच घ्यायचा असल्यास, तो पचण्यास हलका असल्यामुळे भोजनाच्या काही वेळानंतर परत भूक लागल्याची भावना होते. असे न होण्यासाठी भातासोबत प्रथिनांनी आणि फायबरने परिपूर्ण असलेल्या भाज्या भोजनामध्ये समाविष्ट कराव्यात. तसेच भात खाताना तो तेलावर परतून खाणे, किंवा तो बनवित असताना त्यामध्ये जास्त तूप किंवा बटरचा उपयोग टाळावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment