मधल्या वेळेच्या भुकेसाठी सेवन करावेत हे ‘स्नॅक्स’

fod
सकाळचा भरपेट नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे भोजन, ही आपल्या दिनक्रमातील तीन महत्वाची भोजने मानली गेली आहेत. या तीन भोजनांच्या व्यतिरिक्त मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी काही खाल्ले गेले नाही, तर पुढील भोजनाच्या वेळी जास्त भूक लागल्यामुळे प्रमाणाबाहेर जास्त भोजन घेतले जाते. परिणामी अपचन, अॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवितात. तसेच अधून मधून लागणाऱ्या भुकेवर उपाय म्हणून चिप्स, भजी, वडापाव, सामोसे अश्या पदार्थांची जोड अनेकदा आपण देत असतो. मधल्या वेळी खाल्ल्या गेलेल्या अशा पदार्थांमुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे मधल्या वेळेची भूक शमविण्यासाठी असे पदार्थ आहारामध्ये समाविष्ट केले जावेत, जे पचण्यास हलके असतील, आणि ज्यांच्या सेवनामुळे वजनही वाढणार नाही.
fod1
मधल्या वेळेच्या भुकेसाठी सुकामेवा हा चांगला पर्याय ठरू शकतो. अक्रोड, बदाम, शेंगदाणे, खारीक इत्यादी सुकामेवा आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे. या मेव्यातून शरीराला आवश्यक जीवनसत्वे, प्रथिने, फायबर आणि ओमेगा थ्री मिळत असतात. त्यामुळे सुक्यामेव्याच्या सेवनाने भूकही शमते आणि शरीराला पोषण मिळते. या व्यतिरिक्त पनीर मधल्या वेळेच्या भुकेसाठी चांगला पर्याय आहे. पनीर मध्ये प्रथिने असून, यामुळे भूक लवकर शमते. शरीरातील स्नायूंच्या बळकटीसाठी प्रथिने आवश्यक असून, ही प्रथिने पनीरसारख्या पदार्थांच्या मधून मिळतात. पनीर कच्चे, किंवा ग्रिल वर भाजून घेऊन सॅलड बरोबर खाता येऊ शकते.
fod2
भाजलेले किंवा कच्चे चणे, कच्चे हरभरे, फुटाणे हा ही पर्याय मधल्या वेळेच्या भुकेसाठी चांगला. यांमध्ये प्रथिनांच्या जोडीने फायबर, क्षार आणि जीवनसत्वे आहेत. यांच्या सेवनाने ब्लडशुगर लेव्हल्स नियंत्रित राहण्यास मदत होते. रताळ्यामध्ये सावकाश पचणारी कर्बोदके, आणि डायटरी फायबरची मात्रा अधिक असून, शरीराला सक्रीय ठेवणारी उर्जा यातून मिळते. मधल्या वेळेच्या भुकेसाठी ताजी फळे हा देखील उत्तम पर्याय आहे. तसेच फळे आपल्यासोबत कुठेही नेता येणे शक्य असल्याने कामानिमित्त बाहेर पडण्याची वेळ आली तरी मधल्या वेळेची भूक भागविण्यासाठी हा उत्तम, पौष्टिक पर्याय आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment