आयसीसीचा श्रीलंकेच्या या बॉलरला धक्का, एक वर्षाची बंदी


कोलंबो : आयसीसीने श्रीलंकेचा फिरकीपटू अकिला धनंजयावर एका वर्षाची बंदी घातली आहे. त्याच्यावर ही कारवाई धनंजयाची बॉलिंग ऍक्शन बेकायदेशीर असल्यामुळे करण्यात आली आहे. अकिला धनंजया हा ऑफ स्पिन, लेग स्पिन आणि कॅरम बॉल टाकणाऱ्या ठराविक बॉलरपैकी एक आहे. श्रीलंकेसाठी २५ वर्षांच्या धनंजयाने ६४ सामन्यांमध्ये १०६ गडी बाद केले आहेत.

धनंजयाने नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये ६ गडी बाद केले होते. त्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात देखील आले होते. याच सामन्यामध्ये धनंजयाची बॉलिंग ऍक्शन संशयास्पद असल्याचे आयसीसीला सांगण्यात आल्यामुळे धनंजया मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळू शकला नाही.

धनंजयाच्या बॉलिंग ऍक्शनची तक्रार आयसीसीकडे करण्यात आल्यानंतर चेन्नईला पाठवून त्याच्या बॉलिंग ऍक्शनची तपासणी करण्यात आली. या तपासणीत धनंजयाच्या बॉलिंग ऍक्शनमध्ये दोष असल्याचे आढळून आले. याआधी मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातही बॉलिंग ऍक्शनमुळे धनंजयावर बंदी घालण्यात आली होती. आयसीसीच्या नियमानुसार कोणत्याही बॉलरचं वर्षात दोनदा निलंबन होत असेल तर त्याच्यावर एक वर्षाची बंदी आपोआप लागते.

अकिला धनंजया या कारवाईमुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेला मुकणार आहे. धनंजयाने श्रीलंकेसाटी ३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५१ गडी, २२ टी-२०मध्ये २२ आणि ६ कसोटी सामन्यांमध्ये ३३ गडी बाद केले आहेत.

Leave a Comment