बलात्कार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांना अटक


नवी दिल्ली – महाविद्यालयीन तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि विशेष तपास पथकाने कारवाई करत माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक केली आहे. आज सकाळी चिन्मयानंद यांना शहाजहांपूर येथील आश्रमातून विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली असून वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. त्यानंतर चिन्मयानंद यांना न्यायालयात हजर केले जाईल. जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असून एसआयटीचे पथक देखील रुग्णालयात आहे.

स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्कार केल्याचा तसेच एक वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप उत्तर प्रदेशातील शहाजहांपूर येथील वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने केला आहे. सोशल मीडियावर यासंबंधीत एक व्हिडिओ देखील व्हायरल होत असून या व्हिडीओत एक व्यक्ती निर्वस्त्र होऊन मसाज करुन घेत असल्याचे दिसत आहे. ही व्यक्ती स्वामी चिन्मयानंद असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर चिन्मयानंद यांना अटक करण्याच्या मागणीने जोर धरला होता. या आरोपांनंतर गेल्या शुक्रवारी एसआयटीच्या पथकाने जवळपास सात तासांपर्यंत चिन्मयानंद यांची चौकशी केली होती.

याशिवाय, पीडित तरुणीने एका वृत्तवाहिनीला बुधवारी दिलेल्या मुलाखतीत, चिन्मयानंद यांना जर अटक नाही झाली तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. एसआयटीच्या तपासावर पीडित तरुणीने नाराजी व्यक्त करत चिन्मयानंद यांच्याविरोधात कारवाई कधी केली जाणार असा प्रश्न उपस्थित केला होता. एसआयटीने तरुणीच्या या वक्तव्यानंतर बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी, एसआयटी कोणाच्या भावनांनुसार किंवा कोणाच्या अपेक्षेनुसार तपास करणार नाही. तथ्ये आणि विधानांच्या आधारे एसआयटी चौकशी करत आहे. तसेच सर्व बाजूंनी संयम साधण्याची गरज असल्याचे एसआयटीचे आयजी नविन अरोरा म्हणाले होते. २३ तारखेला या प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल अशी माहिती त्यावेळी एसआयटीकडून देण्यात आली होती. पण त्यापूर्वीच आता चिन्मयानंद यांना अटक झाली आहे.

Leave a Comment