इसिस, अल कायदाला आधार फेसबुकचा!


जगातील प्रमुख सोशल मीडिया कंपनी असलेली फेसबुक अतिरेकी साहित्याविरुद्ध पुरेशी पावले उचलत नाही, अशी टीका वारंवार होत असते. या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्नही फेसबुकच्या वतीने करण्यात येतो. आपल्या स्वयंचलित यंत्रणा इस्लामिक स्टेट (इसिस) आणि अल कायदा यांसारख्या दहशतवादी गटांचे साहित्य उघडकीस येण्यापूर्वीच काढून टाकते, असा कंपनीचा दावा आहे. मात्र फेसबुकने स्वतःच या संघटनांच्या नावाने डझनभर पृष्ठे तयार करुन या दोन अतिरेकी गटांना नेटवर्किंग व भरतीचे साधन उपलब्ध करून दिले आहे. एका जागरूक व्यक्तीच्या तक्रारीने हे बिंग फोडले आहे.

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे करण्यात आलेल्या एका तक्रारीवरून हे ताजे तपशील समोर आले आहे. नॅशनल व्हिसलब्लोअर सेंटर ही संस्था या आठवड्यात ही तक्रार दाखल करून घेणार आहे. अमेरीकी संसदेच्या सिनेट सभागृहातील वाणिज्य, विज्ञान आणि परिवहन समितीवरील संसद सदस्य या संदर्भात सोशल मीडिया कंपन्यांची चौकशी करणार आहेत. यात फेसबूकच्या या शाखेच्या प्रमुख असलेल्या मोनिका बिकर्ट यांचाही समावेश आहे.

व्यवसायांसाठी फेसबुकने स्वयंचलित तयार केलेल्या पृष्ठांद्वारे पश्चिम आशियातील अतिरेकी आणि अमेरिकेतील गोऱ्या वर्चस्ववाद्यांना कशा प्रकारे मदत होते, हे चार महिन्यांपूर्वी असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने पुढे आणले होते. मात्र त्यानंतरही फेसबुकच्या कामकाजात फारशी प्रगती झालेली नाही, असे या संस्थेने म्हटले आहे.

असोसिएटेड प्रेसने हस्तगत केलेल्या कागदपत्रांनुसार, अशा प्रकारच्या इस्लामिक स्टेट गटाचा थेट उल्लेख असलेली 200 स्वयंजनित पृष्ठांची (ऑटोजनरेटेड पेजेस) आतापर्यंत ओळख पटवण्यात आली आहे, तर अल-कायदा व इतर दहशतवादी गटांचा उल्लेख करणारे डझनभर पेजेस आहेत. यातील काही पेजेस व्यवसायांसाठी, काही शाळांसाठी तर काही इतर वर्गांसाठी बनवण्यात आली आहे. राजकीय विचारसरणी” म्हणून सूचीबद्ध असलेल्या एका पेजचे शीर्षक आहे, “मला इस्लामिक स्टेट आवडते. त्यात फेसबुकच्या प्रसिद्ध थंब्स-अप चिन्हाच्या रेखाकृतीत इसिसचा लोगो आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले, की वाईट लोकांना आळा घालण्यासाठी धोकादायक व्यक्ती आणि संस्थांविरूद्ध आम्ही कारवाई करतो. आमच्या धोरणाचे उल्लंघन करणार्या लोकांनी पोस्ट केलेली सामग्री शोधणे आणि काढून टाकणे याला आम्ही प्राधान्य देतो. स्वयंजनित पृष्ठे ही सामान्य फेसबुक पृष्ठांसारखी नसतात कारण लोक त्यांच्यावर टिप्पणी देऊ शकत नाहीत किंवा पोस्ट करू शकत नाहीत आणि आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारी कोणतीही सामग्री आम्ही काढून टाकतो. आम्ही प्रत्येकाला पकडू शकत नसलो तरी आम्ही या प्रयत्नात जागरूक राहतो.

फेसबुकमध्ये असे अनेक फंक्शन्स आहेत जे वापरकर्त्यांनी पोस्ट केलेल्या सामग्रीमधून स्वयंचलितपणे पेजेस तयार करतात. या ताज्या तक्रारीमुळे व्यवसाय नेटवर्किंगसाठी मदत करणार्या एका फंक्शनची छाननी होणार आहे. यात वापरकर्त्यांच्या नोकरीच्या माहितीचे संकलन करून व्यवसायासाठी पृष्ठे तयार करण्यात येतात. या प्रकरणात वापरकर्त्यांना पेज लाईक करण्याची मोकळीक असते. त्यामुळे इसिससाठी भरती करू पाहणाऱ्यांना आपले सहानुभूतीदार शोधणे सोपे होते. याचाच अर्थ इसिस व अन्य दहशतवादी संघटनांना मदत होते.

या तक्रारीत असेही आढळले आहे, की अतिरेकी गटांना प्रोत्साहन देणारी वापरकर्त्यांची पेजेस शोधणे खूप सोपे आहे म्हणजे त्यांची केवळ नावे वापरुन शोधणेही शक्य आहे. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यातील अपहरणकर्ता असलेला व अल कायदाचा दहशतवादी अल कायदाचा दहशतवादी याचेही एक पेज अधिकाऱ्यांना सापडले. त्यात या दहशतवाद्याचा प्रसिद्ध फोटोही होता. या पेजमध्ये वापरकर्त्याचे कार्य “अल कायदा”, शिक्षण “युनिव्हर्सिटी मास्टर बिन लादेन” आणि “शाळा दहशतवादी अफगाणिस्तान” असे लिहिलेले आहे.

अतिरेकी साहित्याचा प्रसार करण्यास मदत केल्याबद्दल फेसबुकवर आतापर्यंत अनेकदा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावर कारवाई करण्याचा प्रयत्नही फेसबुकने केला आहे, मात्र त्यात त्याला संमिश्र यश आले आहे. मार्च महिन्यात अमेरिकेतील गोऱ्या राष्ट्रवादी आणि गोऱ्या फुटीरवादी सामग्री तसेच आंतरराष्ट्रीय अतिरेकी गटांच्या साहित्याचा प्रतिबंधित सामग्रीत समावेश करण्यात आला होता. आपण गोऱ्या वर्चस्ववादी संघटनांवर आणि इसिस व अल कायदासारख्या जागतिक दहशतवादी संघटनांच्या 2 कोटी 60 लाख सामग्रीच्या तुकड्यांवर कारवाई केल्याचा त्याचा दावा आहे.

मात्र त्याचे हे प्रयत्न तोकडे पडत आहेत हे या ताज्या प्रकरणावरून हे दिसून येते. फेसबुकने आणखी काळजी घ्यायला हवी, हे सांगण्याशिवाय आपण काय करू शकतो?

Leave a Comment