भारतीय नागरिकत्व घेणाऱ्या अदनान सामीला 50 लाख रुपयांचा दंड


मुंबई : 2003 मध्ये पाकिस्तानचं नागरिकत्व असूनही मुंबईत फ्लॅट आणि पार्किंगची जागा खरेदी केल्याप्रकरणी गायक अदनान सामीवर 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पण अदनान सामीसाठी हा दंड काहीसा दिलासा आहे. ईडीने याआधी अदनान सामीची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला होता, पण 12 सप्टेंबर रोजी हा आदेश लवादने फेटाळला.

अदनान सामीने 2003 साली मुंबईत 8 फ्लॅट आणि 5 पार्किंग जागांची खरेदी केली होती. त्याच्याकडे त्यावेळी पाकिस्तानचे नागरिकत्व होते. अदनानने आरबीआयला या संपत्तीच्या खरेदीची माहिती दिली नव्हती आणि ही बाब परदेशी नागरिकांसाठी गरजेची असते.

जर परदेशी नागरिकाने भारतीय कायद्यानुसार भारतात संपत्ती खरेदी केली किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक केली तर याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देणे बंधनकारक आहे. पण याची माहिती अदनान सामीने आरबीआयला दिली नाही हे समजताच, ईडीने त्याच्यावर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट अंतर्गत 2010 मध्ये 20 लाख रुपयांचा दंड ठोठावून संपत्ती जप्त केली. अदनानने याविरोधात अपीलेट ट्रायब्यूनलमध्ये दाद मागितली होती. आता यावर ट्रायब्यूनलचा निकाल आला आहे.

ट्रायब्यूनलचे चेअरमन म्हणाले की, कोणत्याही प्रकारे परकीय चलनाचा या प्रकरणात समावेश नसल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. संपूर्ण रक्कम भारतीय रुपयांमध्ये फेडण्यात आली. त्याचबरोबर संपत्तीसाठी कर्ज घेतले, तसेच देशाबाहेर झालेली कमाई आणि त्यावर लागलेला करही अदनान सामीने भारतीय रुपयांमध्ये भरला.

ट्रायब्यूनलने या गोष्टीचा आधार घेत फेमा कायद्याअंतर्गत जप्तीचा आदेश फेटाळला. पण ईडीने लावलेल्या दंडाची रक्कम वाढवून 50 लाख रुपये केली आहे. अदनान सामीला यापैकी 40 लाख रुपये भरावे लागणार आहेत. कारण त्याने 10 लाख रुपये आधीच भरले आहेत. दंडाची रक्कम भरण्यासाठी अदनान सामीला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

अदनान सामी ट्रायब्यूनलच्या निर्णयावर आनंद व्यक्त करताना म्हणाला की, माझ्या मेहनतीच्या कमाईने खरेदी केलेली संपत्ती वाचली ही मोठी आणि दिलासादायक गोष्ट आहे. दरम्यान, 2016 मध्ये अदनान सामीला भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले होते.

Leave a Comment