विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न इस्रोने थांबवले


नवी दिल्ली: इस्रोने अप्रत्यक्षपणे चंद्रावर उतरलेल्या ‘विक्रम’ लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न संपल्याचे स्पष्ट केले आहे. एका ट्विटद्वारे चांद्रयान-२ मोहिमेला देशभरातून भरघोस पाठिंबा दिल्याबद्दल इस्रोने सर्वांचे आभार मानले आहेत. याचा अर्थ विक्रम लँडरशी सर्व प्रकारे संपर्क साधण्याचे प्रयत्न करूनही संपर्क होत नाही आहे.


इस्रोने आता त्यामुळे विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न थांबवल्याचे स्पष्ट केले आहे. पण चांद्रयान २ चे ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत असून, पुढील सात वर्षं ऑर्बिटर चंद्राबद्दल विविध उपकरणांच्या माध्यमातून माहिती देत रहणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला असता. त्यामुळे भारत एका ऐतिहासिक यशाला मुकला होता. मात्र, यानंतर संपूर्ण देश इस्रोच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला होता.

चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग होणे अपेक्षित होते. पण, शेवटच्या टप्प्यात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर जोरात आदळले असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. यानंतर चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरने विक्रम लँडरचा शोध लावला होता. मात्र, विक्रम लँडर नक्की कोणत्या स्थितीत आहे, हे समजू शकले नव्हते.

Leave a Comment