यंदाच्या अ‌ॅशेस मालिकेत स्टिव्ह स्मिथची या विक्रमांना गवसणी


इंग्लंडने अ‌ॅशेसच्या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३५ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-२ ने बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथची या मालिकेत सर्वात जास्त चर्चा झाली. या मालिकेत फलंदाजीमध्ये स्मिथने अफलातून प्रदर्शन करत सर्वांची वाहवा मिळवलीच त्याचसोबत त्याने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे.

स्मिथने ओव्हल मैदानावर खेळवण्यात आलेल्या पाचव्या कसोटीत २३ धावांची खेळी केली. स्मिथने या मालिकेत पहिल्यांदा ५० धावांपेक्षा कमी धावा केल्या. ११०.५७ च्या सरासरीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या स्मिथने ७७४ धावा केल्या आहेत. त्याने यामध्ये तीन शतके आणि तीन अर्धशतके केली आहेत. १९९४ नंतर, कसोटीतील या सर्वोच्च धावा आहेत. याआधी वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने ७७८ धावा केल्या होत्या.

सुनील गावस्कर यांनी १९७१ साली विंडीजविरुद्ध ५ पैकी ४ सामने खेळले होते. त्यांनी त्यामध्ये ७७४ धावा केल्या होत्या. गावस्कर एका सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते. स्मिथने २१ व्या शतकात एका मालिकेत सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम रचला आहे. त्याने असे करताना आपलाच विक्रम मोडित काढला. स्मिथने २०१४-१५ मध्ये भारताविरुद्ध ७६९ धावा केल्या होत्या.

अ‌ॅशेस मालिकेत स्मिथने इंग्लंडविरुद्ध आपले १० वे अर्धशतक झळकवले. एका संघाविरुद्ध सर्वात जास्त अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम आता स्मिथच्या नावावर झाला आहे. त्याने हा विक्रम करताना पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकला मागे टाकले आहे. इंग्लंडविरुद्ध इंझमामने लागोपाठ ९ वेळा अर्धशतकी खेळी केली होती.

स्मिथने एका मालिकेत सर्वात जास्त धावा करण्याच्या विक्रमात १२ वे स्थान पटकावले आहे. तर, त्याने अ‌ॅशेसमध्ये पाचवे स्थान मिळवले आहे. याअगोदर १९३० मध्ये डॉन ब्रॅडमन यांनी ९७४ धावा, वाली हेडमंड यांनी १९२९ मध्ये ९०५ धावा, मार्क टेलर यांनी १९८९ मध्ये ८३९ धावा आणि ब्रॅडमन यांनी १९३७ मध्ये ८१० धावा केल्या होत्या.

Leave a Comment