लालबागच्या राजाच्या चरणी यंदा कोट्यवधीचे रुपये दान


मुंबई: यंदा देखील कोट्यवधीच्या घरात लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात आले आहे. राजाच्या चरणी यंदा तब्बल ६ कोटी रुपये दान स्वरुपात प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर ३ किलोहून अधिक सोने आणि ५७ किलो चांदी देखील भविकांनी राजाच्या चरणी दान केली असल्यामुळे या दान स्वरुपातील रक्कमेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान यंदा सतत पाऊस सुरु असल्याने अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये फारशी गर्दी पाहायला मिळाली नव्हती. लालबागच्या राजाच्या मंडपात देखील सुरुवातीचे काही दिवस गर्दी कमीच होती. पण शेवटच्या तीन ते चार दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली होती. त्यामुळेच यंदाही सहा कोटी एवढे प्रचंड दान राजाच्या चरणी झाल्याचे समजत आहे. दरम्यान, राजाच्या चरणी दान करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव देखील करण्यात आला. यातून देखील मंडळाला कोट्यवधी रुपये मिळाले आहेत.

लालबागच्या राजाच्या चरणी संपूर्ण मुंबईसह अगदी देशभरातून लोक दरवर्षी येत असतात. राजाच्या चरणी हेच भाविक भरभरून दान देतात. यावेळी रोख रक्कम, सोने-चांदीच्या वस्तूंसह अनेक गोष्टी दान केल्या जातात. पण यासोबतच अनेकदा काही भाविक परदेशी चलन देखील दान स्वरुपात देत असल्याचे दिसून आले आहे. राजाच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान होत असल्याने त्याची योग्य मोजणी करण्यासाठी मंडळाने तब्बल ९० जणांची एक वेगळी टीमच नेमली आहे.

मंडळातील ९० जणांची विशेष टीम ही गेले काही दिवस सतत पैशाची मोजणी करत आहे. आतापर्यंत दान करण्यात आलेल्या अनेक वस्तूची मोजदाद झाली असून आता त्यातील अनेक वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असल्याने अनेकजण हे राजाच्या चरणी अनेकविध गोष्टी दान करतात. यावेळी काही भाविकांनी तर सोन्याचे अनेक दागिने बाप्पाला अर्पण केले आहेत. यामध्ये एका भाविकाने सोन्याचे ताट, वाट्या, ग्लास आणि चमचे अर्पण केले आहेत. तर एका भाविकाने तब्बल अर्धा किलो वजनाचे चांदीची पावले दान केली आहेत. दरम्यान, यंदा लालबागचा राजा मंडळाने मोठ्या प्रमाणात भाविकांसाठी वेगवेगळ्या स्वरुपात सोय केली होती. पण यंदा तरीही गर्दीने उच्चांक गाठल्याने भाविकांना दर्शनासाठी तासनतास रांग लावावी लागली.

Leave a Comment