‘ट्रिपल सीट’ इन्स्पेक्टर दिवानेच्या भूमिकेत दिसणार प्रविण तरडे


‘मुळशी पॅटर्न’ मधील नन्या भाईची भूमिका साकारणारे अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे भाईगिरीनंतर आता संकेत पावसे दिग्दर्शित ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटात एका पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. नुकतेच ‘ट्रिपल सीट’मधील त्यांचा इन्स्पेक्टर दिवानेचा लूक असलेले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

खाकी वर्दीतील प्रविण विठ्ठल तरडे यांनी हाताची मूठ बांधून, चेहऱ्यावर काहीसे संयमित भाव ‘ट्रिपल सीट’च्या नव्या पोस्टरवर ठेवलेले आहेत, ते कुणाला तरी इशारा करत असावेत असे दिसते. तरडे यांना प्रेक्षकांनी यापूर्वी ‘रेगे’ मध्ये पोलीस अधिकारी म्हणून बघितले होते, आता या नव्या लूकमधील त्यांचा भाऊराव दिवाने हा पोलीस इन्स्पेक्टर नेमका कसा असणार हे बघणे औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संकेत पावसे यांनी केले आहे.

अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्या ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटात प्रमुख भूमिका असून या पोस्टरच्या माध्यमातून प्रविण विठ्ठल तरडे यांचीही महत्वपूर्ण भूमिका असल्याचे दिसते, या चित्रपटात आणखी कोणते कलाकार आहेत? हे जाणून घेण्यासाठी थोडे दिवस वाट बघावी लागणार आहे. ‘वायरलेस प्रेमाची गोष्ट’ अशी टॅगलाईन असलेला ‘ट्रिपल सीट’ हा मराठी चित्रपट यंदाच्या दिवाळीत दिवाळीत २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

Leave a Comment