डॉ. मशहूर गुलाटीची होणार ‘द कपिल शर्मा शो’मध्ये वापसी ?


द कपिल शर्मा शोमधील सुप्रसिद्ध असलेली व्यक्तिरेखा डॉ. मशहूर गुलाटी साकारणारा सुनील ग्रोव्हरने कपिल शर्माबरोबर झालेल्या वादानंतर त्याच्या शोला रामराम ठोकला. त्यानंतर त्याला परत आणण्यासाठी सलमान खानपासून अनेकांनी प्रयत्न केले. पण कोणालाही त्याची मनधरणी करण्यात यश मिळाले नाही. त्याची कपिलनेसुद्धा माफी मागितली आणि शोचे दरवाजे त्याच्यासाठी कायमच खुले असल्याचे स्पष्ट केले होते. आता या शोमध्ये सुनील परतण्याची शक्यता आहे. कारण त्याने तसे सूचक ट्विट नुकतेच केले आहे.


सुनीलने आपल्या ट्विटमध्ये ”प्रत्येक गोष्ट येणार आहे. काहीही कायमचे राहणार नाही. म्हणून फक्त कृतज्ञ राहा आणि हो, खळखळून हसा. बाकी… मेरे हस्बंड मुझको…,” असे म्हटले आहे. सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये साकारलेल्या रिंकू भाभी आणि डॉ. मशहूर गुलाटीच्या भुमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले. त्याने त्यादरम्यान एक म्युझिक व्हिडीओसुद्धा रिलीज केला होता. ‘मेरे हस्बंड मुझको पियार नहीं करते, असे त्या गाण्याचे बोल होते. सुनीलच्या ट्विटमध्ये याच गाण्याचा उल्लेख पाहायला मिळत असल्यामुळे कपिल शर्माच्या शोमध्ये तो परतणार आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment