महिला क्रिकेटला ही मॅच फिक्सिंगचे ग्रहण


नवी दिल्ली – मॅच फिक्सिंगसाठी भारताच्या एका महिला क्रिकेटपटूला विचारणा करण्यात आली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा प्रकार इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेमध्ये घडला असल्याचे समजते. सोमवारी याबाबतची माहिती बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने दिली.

बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने याबाबत दोन व्यक्तींविरोधात सोमवारी तक्रार दाखल केली आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमख अजितसिंह शेखावत यांनी याची माहिती दिली. शेखावत यांनी याप्रकरणी बोलताना सांगितले की, फिक्सिंगसाठी भारताच्या महिला क्रिकेटपटूकडे विचारणा झाली असल्याची माहिती बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिली. या गोष्टीचा त्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आयसीसी करत आहे.

तसेच या घटनेची माहिती देऊन त्या खेळाडूने चांगले काम केल्याचेही शेखावत म्हणाले, दरम्यान, बंगळुरु पोलिसांची बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने मदत मागितली आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने बंगळुरु पोलीसांना राकेश बाफना आणि जितेंद्र कोठारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करायला सांगितली आहे.

दरम्यान आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अजितसिंग शेखावत यांनी भारतीय क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी सट्टेबाजीला कायदेशीररित्या मान्यता देण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी मॅच फिक्सिंग कायदा सुचविला. शेखावत राजस्थानमधील पोलिस महासंचालक होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ते अँटी करप्शन युनिटचे प्रमुख झाले होते. शेखावत यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा सट्टेबाज 12 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या संपर्कात आहेत. दुसरीकडे, प्रथमच एका भारतीय महिला क्रिकेटपटूने फिक्सिंगबद्दल तक्रार केली आहे.

मॅच फिक्सिंग प्रकरणात यावर्षी मुंबई, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये स्पॉट फिक्सिंग थांबविणे अशक्य आहे का, असे शेखावत यांना विचारले गेले. यावर ते म्हणाला, असे नाही जे थांबवता येणार नाही. आम्हाला त्याविरुद्ध मॅच फिक्सिंग कायदा करण्याची आवश्यकता आहे. त्याविरूद्ध एखादा स्पष्ट कायदा केल्यास पोलिसांची भूमिका देखील स्पष्ट होईल.

Leave a Comment