नोव्हेंबरच्या या तारखेला होऊ शकतो भारत-पाक सामना


नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी डेव्हिस कप स्पर्धेतील सामन्याचे वेळापत्रक ठरले असून नोव्हेंबरच्या शेवटी हे सामने होऊ शकतात. याबाबतची माहिती आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) दिली आहे. हे सामने यावर्षीच्या २९-३० नोव्हेंबर किंवा ३० नोव्हेंबर-१ डिसेंबरला खेळवण्यात येऊ शकतात.

सामन्याचे वेळापत्रक ठरले असले तरी सामन्याचे ठिकाण अजून ठरलेले नाही. सामन्याचे ठिकाण चार नोव्हेंबरला पार पडणाऱ्या बैठकीत ठरवण्यात येईल. एका प्रसारमाध्यमाला अखिल भारतीय टेनिस संघ (एआयटीए) चे महासचिव हिरनमॉय चॅटर्जी यांनी सांगितले, आम्हाला तारखांबाबत आयटीएफने कळवले असून चार नोव्हेंबरला पार पडणाऱ्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर सामन्याने नियोजन करण्यात येईल.

चॅटर्जींनी पाकिस्तान येथे खेळाडू पाठवणार का? या प्रश्नावर आता उत्तर देणे योग्य नाही, असे म्हटले आहे. या सामन्यांसाठी भारत पाकिस्तानला रवाना होणार होता, पण कलम ३७० च्या मुद्दयामुळे हा विषय बाजुला राहिला. हा सामना आधी १४-१५ सप्टेंबरला होणार होता, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव डेव्हिस कप समितीने हे सामने नोव्हेंबरपर्यंत स्थगित केले.

Leave a Comment