अखेर राष्ट्रवादी खासदार छत्रपती उदयनराजेंचा भाजप प्रवेश


नवी दिल्ली – आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हाती कमळ घेतले. त्यांचा नवी दिल्लीत भाजप प्रवेश झाला. सातारा जिल्ह्यात त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होते. भाजपमध्ये ते प्रवेश करणार अशा जोरदार चर्चा रंगत होत्या. या सर्व चर्चांना आज अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उदयनराजेंनी गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीला रामराम ठोकत अखेर हाती कमळ घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी नेते यावेळी उपस्थित होते.

देशाला सर्वधर्म समभावाचा विचार छत्रपती शिवाजी महारांजांनी दिला आहे. आपली लोकशाही त्या आदर्शावर चालत आहे. त्यांच्या अष्टप्रधान मंडळावर आधारलेली सत्ता आहे. भाजप शिवरायांचे विचार घेऊनच पुढे जात असल्याचे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. प्रत्येक राज्यात विकास होत असल्यामुळेच अनेकजण भारतीय जनता पक्षात येत आहेत. भाजपने पहिल्यांदाच काश्मीरप्रश्नी मोठे पाऊल उचलले आहे. हे देशाच्या अंखडतेसाठी गरजेचे असल्याचेही उदयनराजे म्हणाले.

भाजपमध्ये कोणाच्या सांगण्यावरून जनता जोडली जात नाही तर ती त्यांच्या विचारसरणीमुळे पक्षात येत आहे. मीही त्याचप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश केला. मी निस्वार्थीपणे जनहितासाठी ३ महिन्यात खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचेही उदयनराजे म्हणाले. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यासोबत मिळून मी देखील काम करेन असेही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवछत्रपती यांनी स्वराज्यासाठी एक संघर्ष सुरू केला आणि हिंदवी स्वराजाची स्थापना केली. त्यांचेच वंशज आज भाजपमध्ये दाखल होत असल्याचा आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले. मी तमाम भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आज राजेंचे स्वागत करतो. भाजप जनसंघ असल्यापासून शिवरायांच्या विचारांवर चालत असल्याचेही शाह म्हणाले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत चांगले निकाल येतील. महाराष्ट्राचे गौरव पुन्हा मिळवून देण्याचे काम फडणवीस सरकार करेल. विधानसभेला आम्ही ३/4 जागांनी विजयी होऊ असा विश्वासही यावेळी अमित शाह यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवरायांचे नाव येताच देशात त्यांच्या आदर्शाची चर्चा केली जाते. उदयनराजे हेही त्याचप्रमाणे आहेत. राष्ट्रवादीतून आज भाजपमध्ये उदयनराजेंनी प्रवेश केला. राजेंनी काश्मीर प्रश्नाची प्रशंसा केली. जर देश एकसंध करण्याचे काम मोदी करत असतील तर त्यांना छत्रपती शिवरायांचे वंशज पाठिंबा का देणार नाहीत, असे म्हणत त्यांनी उदयनराजेंचे स्वागत केले. राजेंच्या मागे युवाशक्ती असल्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला मोठी युवा शक्ती मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मोंदींनी रायगडावर शिवरायांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या विचारावर सत्ता चालवली असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment