नोकरी-व्यवसाय सांभाळताना अशी घ्या आपल्या तब्येतीची काळजी

habbit
नोकरी-व्यवसाय सांभाळत असताना होणारी दिवसभराची धावपळ थकवून टाकणारी असते. ही दिवसभर सुरूच असणारी धावपळ जर झेपेनाशी झाली, आणि त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर किंवा तब्येतीवर होऊ लागला, तर आपल्या दैनंदिन आहारामध्ये आणि सवयींमध्ये थोडेसे परिवर्तन करणे अगत्याचे ठरते. सकाळी उठून कामावर जाण्यापूर्वी नाश्ता करणे आवश्यक आहे. रात्रीच्या भोजानंतर सकाळी उठल्यानंतर सकाळचा नाश्ता हे आपले पहिलेच भोजन असते. दिवसभराच्या कामासाठी शरीराला उर्जा देण्यासाठी आणि चयापचय शक्ती सक्रीय होण्यासाठी सकाळचा नाश्ता अतिशय आवश्यक ठरतो. सकाळच्या नाश्त्यामध्ये ताजी फळे, सुकामेवा, फायबर युक्त पदार्थ, दुध, दही, ताक असे अनेक पर्याय अवलंबता येतील.
habbit1
दिवसभराच्या कामाच्या धकाधकीत पुरेसे पाणी पिणे विसरू नये. विशेषतः वातानुकुलित ऑफिस असेल तर शरीरातील पाण्याचे प्रमाण लवकर कमी होते. त्यामुळे लवकर थकवा येऊ शकतो. म्हणूनच दिवसभर वारंवार थोडे थोडे पाणी पिणे आवश्यक आहे. जर कामानिमित्त बाहेर पडण्याची वेळ आली, तर सोबत पाण्याची बाटली नेण्यास विसरू नये. साधे पाणी पिण्याच्या ऐवजी ‘डी टॉक्स वॉटर’चा पर्यायही चांगला आहे. यासाठी पिण्याचे पाणी एका बाटलीमध्ये भरून घेऊन त्यामध्ये थोडीशी पुदिनायची पाने, काकडीचे काप, लिंबाचे काप घालून या पाण्याचे सेवन दिवसभर करीत राहावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील घातक पदार्थ बाहेर पडण्यास मदत होतेच, या पाण्यामध्ये घातलेल्या पदार्थांमुळे शरीराला पुरेशी जीवनसत्वे आणि क्षारही मिळत असतात.
habbit2
ऑफिसमध्ये दुपारच्या वेळी भूक लागल्यास तळलेले, मसालेदार पदार्थ खाण्याच्या ऐवजी ताज्या फळांचे सेवन करावे. यामुळे शरीराला आवश्यक ती उर्जा मिळून अन्य पोषक तत्वे आणि फायबरही मिळत असते. घरून सहज नेता येईल आणि सहज खाता येईल असे एखादे फळ नेहमी आपल्यासोबत असावे. तसेच फळांच्या ऐवजी थोडासा सुकामेवाही आपल्याजवळ ठेवता येऊ शकेल. ऑफिसमध्ये एकीकडे काम करण्याच्या नादामध्ये दुसरीकडे दिवसभरामध्ये चहा आणि कॉफीचे सेवन किती होते आहे याकडे लक्ष असावे. चहा किंवा कॉफी ऐवजी ग्रीन टीचे सेवन अधिक फायदेशीर आहे. शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी असलेली कॅफिनची गरजही ग्रीन टी पुरी करतो, या द्वारे अतिरिक्त साखरेचे सेवनही टाळता येते.
habbit3
दिवसभर काम करताना ताकद टिकून राहावी या करिता भोजनाचे वेळापत्रक सांभाळणे आवश्यक आहे. त्यासाठी दिवसभरातील भोजनांच्या वेळांमध्ये फारशी तफावत नसेल याची काळजी घ्यावी. तसेच दर तीन ते चार तासांनी काही ना काही खावे. त्यामुळे शरीराला सक्रीय राहण्यासाठी आवश्यक उर्जा मिळत राहते. त्याचप्रमाणे आपण मधल्या वेळेला काय खात आहोत, ते आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे किंवा नाही याकडे लक्ष देणे ही आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment