लसिथ मलिंगाची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात हॅटट्रीक


नवी दिल्ली – श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाने शुक्रवारी पल्लकेलेच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यात हॅटट्रीकची नोंद केली आहे. मलिंगाची ही टी-२० क्रिकेटमधील दुसरी हॅटट्रीक ठरली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत मलिंगाच्या नावावर ५ हॅटट्रीकची नोंद आहे.


श्रीलंकेने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ गड्यांच्या मोबदल्यात १२५ धावांपर्यंत मजल मारली. मलिंगाने प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला चांगलाच दणका दिला. मलिंगाने कॉलिन मुनरो, हमीश रुदरफोर्ड, कॉलिन डी-ग्रँडहोम आणि रॉस टेलर यांना तिसऱ्या षटकात लागोपाठच्या चेंडूवर बाद करत हॅटट्रीक नोंदवली. मलिंगाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ चेंडूत ४ बळी घेण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी २००७ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सामन्यात त्याने अशी कामगिरी करुन दाखवली होती. मलिंगाने चार फलंदाजांना माघारी पाठवल्यानंतर पाचव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टीम सेफेर्टलाही माघारी धाडत न्यूझीलंडला पाचवा धक्का दिला. पहिल्या ३ षटकांच्या स्पेलमध्ये मलिंगाने एक षटक निर्धाव टाकत ५ धावा देत निम्मा संघ गारद केला.

Leave a Comment