इस्रोच्या शास्त्रज्ञांसाठी आनंद महिंद्रांचा खास संदेश


नवी दिल्ली – चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास अवघे एकच मिनिट शिल्लक असतानाच भारताच्या चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटला. यासंदर्भात औपचारिक घोषणा करत विक्रम लँडरशी संपर्क तुटला असून डेटा गोळा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली. इस्रोचे सर्वच शास्त्रज्ञ ‘चांद्रयान २’ मोहिमेचा महत्वाचा टप्पा असणाऱ्या विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने निराश झाल्याचे दिसून आले. पण महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी ट्विटवरुन या सर्व निराश शास्त्रज्ञांना एक खास संदेश दिला आहे.

विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याची बातमी कोट करत आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, संपर्क तुटलेला नाही. प्रत्येक भारतीय व्यक्ती चांद्रयान २ च्या हृदयाची धडधड ऐकू शकतो. आपल्याला ते एक संदेश देत आहेत. तो म्हणजे, पहिल्या प्रयत्नात जर यश मिळाले नाही तर पुन्हा प्रयत्न करा.


१५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास पहिल्यांदा चांद्रयान २ चे प्रेक्षेपण होणार होते त्यावेळीही आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले होते. काही तांत्रिक कारणामुळे हे प्रक्षेपण रद्द होऊन ते नंतर दिवसा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला होता. इस्रोच्या कामगिरीचे महिंद्रा कायमच ट्विटवरुन कौतुक करताना दिसतात. आज चांद्रयान २ मोहिमेत भारतीय शास्त्रज्ञांना प्रथम दर्शनी हवे तसे यश मिळाले नसल्यामुळेच सर्व शास्त्रज्ञांना खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करण्याचा सल्ला महिंद्रा यांनी दिला आहे.

Leave a Comment