स्टिव्ह स्मिथने विराट कोहलीला टाकले मागे


मँचेस्टर – इंग्लंड विरुध्द सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा भरवशाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ भन्नाट फार्मात असून अॅशेसच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने शतक ठोकले. हे स्मिथचे २६ वे शतक असून त्याचे हे या मालिकेतील तिसरे शतक आहे.

स्टिव्ह स्मिथने मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगलेल्या कसोटी सामन्यात १६० चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. स्मिथ पहिल्या दिवशी ६० धावांवर नाबाद खेळत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने शतक पूर्ण केले. सुरू असलेल्या अॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये स्टिव्ह स्मिथने दोन्ही डावात शतक ठोकले आहे. तसेच त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये देखील ९२ धावा केल्या. या खेळीदरम्यान, इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू स्मिथला लागल्यामुळे स्मिथला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले.

तो यानंतर याच कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये खेळू शकला नव्हता. स्मिथची दुखापत गंभीर असल्याने, त्याला तिसऱ्या कसोटीसाठी संघात निवडण्यात आले नव्हते. पण तो त्यानंतर चौथ्या कसोटीसाठी फिट झाला आणि मैदानात उतरला. या कसोटीत त्याने पहिल्या डावात शतक ठोकले.

दरम्यान, चेंडू छेडछाड प्रकरणी स्टिव्ह स्मिथ एक वर्षाच्या निलंबनाच्या शिक्षेनंतर मैदानात उतरला आहे. शतकांच्या बाबतीत त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. कसोटीमध्ये विराट कोहलीने २५ शतके ठोकली आहेत. तर स्मिथने ६७ कसोटी सामन्यात २६ शतके ठोकली आहेत.

Leave a Comment