तमिळ भाषेमध्ये चिदम्बर रहस्यम नावाची एक श्रद्धा आहे. तमिळनाडूतील चिदंबरम या स्थानी असलेलया शिवमंदिरात शंकर आणि पार्वती राहतात. मात्र ते साध्या डोळ्यांना दिसत नाहीत. या ठिकाणी गर्भगृहात केवळ एक पडदा आहे आणि त्या पडद्यापलीकडे काहीच नाही, निव्वळ पोकळी आहे. आध्यात्मिकदृष्ट्या अधिकारी व्यक्तींना येथे शंकर-पार्वतीचे साक्षात दर्शन होते, असे मानतात.
चिदम्बरम रहस्य – राजाचा रंक होण्याची चित्तरकथा!
भारतातील सर्वात वजनदार नेत्यांपैकी एक असलेले आणि कधी काळी पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या पी. चिदंबरम यांचा आणि त्या चिदंबरम मंदिराचा काहीही संबंध नाही. तरीही पळनीयप्पन चिदंबरम उर्फ पी. चिदंबरम यांच्याही नावे एकामागोमाग अनेक रहस्ये नोंद होत आहेत. एका सर्वशक्तीमान नेत्याला तिहार तुरुंगाची हवा खावी लागत आहे आणि राजाचा रंक होण्याची एक चित्तरकथा त्यांच्या नावावर लिहिली जात आहे.
केंद्रीय अर्थमंत्री म्हणून सामान्य माणसाचा स्वप्नातील अर्थसंकल्प सादर करणाऱ्या 73 वर्षांच्या चिदंबरम यांना कधीही आपण तुरुंगात जाऊ से वाटले नसेल. मात्र दिल्लीतील एका न्यायालयाने गुरुवारी चिदंबरम यांना तिहार तुरुंगात पाठवण्याचा आदेश दिला आणि ती वेळही आली.
चिदंबरम यांचा जन्म चेन्नई (तत्कालीन मद्रास) येथील एका संपन्न कुटुंबात झाला. मात्र त्यांच्या आजोबांना व्यवसायात नुकसान झाले आणि त्यांची आर्थिक स्थिती खालावली. त्यांनी हार्वर्ड बिझिनेस स्कूलमधून एमबीए केले तरीही कुटुंबाच्या पारंपरिक व्यवसायात पाऊल ठेवण्याऐवजी त्यांनी राजकारणात येणे पसंत केले आणि 1967 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले. गंमत म्हणजे त्यावेळी काँग्रेसला तमिळनाडूत पराभवाचा सामना करावा लागला होता. आणखी एक गंमत म्हणजे 50 वर्षांपूर्वी राजकारणात आले तेव्हा चिदंबरम हे कट्टर साम्यवाद्यांसारखे सरकार नियंत्रित अर्थव्यवस्थेच्या बाजूने होते. नंतरच्या काळात तेच खुल्या अर्थव्यवस्थेचे कैवारी समोर आले.
काँग्रेसमध्ये त्यांना वर्ष-दीड वर्ष होत नाहीत तोच पक्षात फूट पडली आणि 1969 मध्ये काँग्रेसचे दोन गट निर्माण झाले. त्यावेळी चिदंबरमनी इंदिरा गांधींना साथ दिली. त्यांच्यानंतर ते राजीव गांधींच्या निकट आले आणि 1984 मध्ये त्यांच्या सरकारमध्ये वाणिज्य राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्येही ते वाणिज्य आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री होते. मात्र 1996 साली नरसिंह राव यांनी जयललिता यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक पक्षाशी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी जी. के. मूपनार यांच्यासोबत ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 1996 मध्ये त्यांनी तमिळ मानिला काँग्रेस पक्ष काढला.
त्यांचा हा डाव यशस्वी झाला. देवेगौडा यांच्या नेतृत्वातील 13 पक्षांच्या संयुक्त आघाडी सरकारात ते अर्थमंत्री बनले. याच वेळी ‘ड्रीम बजेट’ सादर करून त्यांनी वाहवा मिळवली. युती व आघाडीच्या सरकारांच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणा गरीबविरोधी असल्याचे मानले जात होते. अशा काळात त्यांनी ही कामगिरी केल्यामुळे चिदंबरम यांच्या वाट्याला कौतुक मोठ्या प्रमाणावर आले.
पुढे चिदंबरम काँग्रेसमध्ये परत आले आणि 2004 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सरकार आल्यानंतर ते मनमोहन सिंह सरकारमध्ये ते अर्थमंत्री झाले. ते 2004 ते 2008 पर्यंत अर्थमंत्री होते आणि डिसेंबर 2008 ते जुलै 2012 पर्यंत गृहमंत्री होते. यूपीए-2च्या कार्यकाळात ते शेवटपर्यंत अर्थमंत्री होते. त्यावेळी काँग्रेस आघाडीचे सत्तेत पुनरागमन झाले तर पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे काँग्रेस नेते पाहत होते.
तमिळनाडूतील शिवगंगा हा चिदंबरम यांचा पारंपरिक मतदारसंघ. येथून त्यांनी सात वेळेस विजय मिळवला. मात्र 2014 साली लोकसभा निवडणुकीत मैदानात न उतरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. सध्या चिदंबरम हे राज्यसभा सदस्य असून अर्थमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवर सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय तपास करत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार 2014 मध्ये सत्तेवर आल्यावर तपास संस्थांनी आयएनएक्स मीडिया, एअरसेल मॅक्सिस आणि एअर इंडियाच्या विमान खरेदीतील गैरव्यवहारांसह अनेक प्रकरणांचा तपास हाती घेतला.
आज परिस्थिती ही आहे, की चिदंबरम आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आज संशयाच्या पिंजऱ्यात उभे आहेत. आयएनएक्स मीडिया प्रकरणात हवाला व्यवहार तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) चिदंबरम यांना 21 ऑगस्ट रोजी अटक केली होती. आज दोन आठवडे झाले तरी त्यांच्या मागचे शुक्लकाष्ठ दूर झालेले नाही आणि आपल्या कारकीर्दीतील सर्वात कठीण प्रसंगातून ते जात आहेत. त्यांची एकामागोमाग एक कुलंगडी बाहेर येत आहेत. त्यानिमित्ताने एका मोठ्या आणि सुशिक्षित नेत्याचे पतन प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे.