स्वस्त होणार गृह आणि वाहन कर्ज


मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने येत्या एक ऑक्टोबरपासून सर्व प्रकारची कर्जे रेपो रेटशी जोडण्याचे आदेश सर्व बँकांना दिले असल्यामुळे स्वस्तातील कर्ज गृह, वाहन कर्जदार तसेच लघूउद्योगांना उपलब्ध होणार आहेत. कर्जांवर मनमानी व्याजदार आकारणाऱ्या बँकांवर त्यामुळे निर्बंध येतील. ग्राहकांपर्यंत प्रमुख व्याजदरात वेळोवेळी कपात होऊनही त्याचा लाभ प्रत्यक्ष पोहोचवण्यात आखडता हात घेणाऱ्या बँकांवर अखेर सक्तीचा बडगा उगारला आहे.

रेपो दर कमी करूनही हा लाभ व्यापारी बँकांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचवला जात नव्हता. खुद्द गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत अनेकदा खंत व्यक्त केली होती. रिझव्‍‌र्ह बँकेने चालू वर्षांत १.१० टक्के रेपो दर कमी करूनही व्यापारी बँकांनी मात्र तुलनेत केवळ ०.४० टक्के दर कपातच केली आहे. स्टेट बँकसारख्या निवडक काही बँकांनीच आतापर्यंत रेपो दराशी निगडित कर्ज व्याजदर सुविधा दिली आहे.

त्यामुळे रेपो दराशी संलग्न व्याजदर उत्पादने वाहन, लघू उद्योगांसाठीही असावीत, असे आदेश देण्यात आल्यामुळे रेपो दर बदलाचा थेट लाभ कर्जदारांना होईल. दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण ऑक्टोबर महिन्यातच असल्याने ऐन सणांच्या तोंडावर स्वस्त कर्जाची भेट कर्जदारांना मिळणार आहे.

Leave a Comment