या बॉलीवूडपटांनी उलगडले गुरु-शिष्याचे अनोखे नाते


शिक्षकांचे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे महत्त्व असते. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत त्याचबरोबर अन्य क्षेत्रात देखील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रगती करत असतो. भारतात प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. ‘शिक्षक दिना’व्यतिरिक्त शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणखी कोणता होऊ शकतो. शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते उलगडणारे बरेचसे चित्रपट सिनेसृष्टीत तयार होत असतात. बॉलिवूडमध्ये रोमॅन्टिक, मसालापट असलेल्या चित्रपटांबरोबरच शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते पडद्यावर पाहायला मिळाले आहे. या चित्रपटातून आपल्याही शाळा आणि महाविद्यालयीन जीवनाच्या आठवणी ताज्या होत असतात. याच दिनाचे औचित्य साधुन आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.

बिहारचे गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ हा चित्रपट अलिकडेच रिलीज झाला होता. आनंद कुमारांची भूमिका हृतिक रोशनने यामध्ये साकारली होती. ज्याप्रकारे विद्यार्थ्यांसाठी आनंद कुमारांनी मेहनत घेतली, याचा प्रवास सुपर ३० मध्ये उलगडला गेला आहे.

‘हिचकी’ चित्रपटात राणी मुखर्जी आपल्या समोर शिक्षिकेच्या भूमिकेत आली होती. तिला यामध्ये टॉरेटेस सिंड्रोम नावाचा आजार असतो. ‘हिचकी’ हा चित्रपट २००८ साली हॉलिवूडमध्ये तयार झालेल्या ‘फ्रंट ऑफ द क्लास’ या चित्रपटावर आधारित होता. अमेरिकेचा प्रेरणादायी वक्ता आणि शिक्षक असलेल्या ब्रॅड कोचेन यांच्या पुस्तकावर हे दोन्हीही चित्रपट आधारित होते. त्याच्या संघर्षाची कथा यामध्ये उलगडण्यात आली होती.

प्रकाश झा यांचा ‘आरक्षण’ हा चित्रपट २०११ साली रिलीज झाला होता. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार यामध्ये दाखवण्यात आला होता. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी डॉ. प्रभाकर आनंद या मुख्याध्यापकाची भूमिका साकारली होती.

२००९ साली ‘३ इडियट्स’ या चित्रपटानेही प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटात मनोरंजनासोबतच एक संदेशही देण्यात आला होता. फक्त परिक्षेत मिळालेले गुणच नाही तर तुमची कला तुम्हाला पुढे घेऊन जाते, असा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आला होता.

शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते अतिशय सुंदररित्या आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटानेही पडद्यावर उलगडले होते. प्रेक्षकांचाही भरभरुन प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला होता.

अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांची भूमिका २००५ साली संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटानेही सर्वांची प्रशंसा मिळवली होती.

२००५ साली नागेश कुकनूर यांचा ‘इक्बाल’ हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये एक दिव्यांग मुलगा क्रिकेटवेडा असतो. या चित्रपटामध्ये गुरु-शिष्याच्या भुमिकेत श्रेयस तळपदे आणि नासिरुद्दीन शाह झळकले होते.

Leave a Comment