नाशिकमध्ये भुजबळांचे शिवसैनिकांकडून जोरदार घोषणांनी स्वागत


नाशिक – पुन्हा एकदा शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा मिळेल अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर छगन भुजबळ हे असताना त्यांनी शिवसेना शाखा महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. उपस्थित शिवसैनिकांनी यावेळी ‘कोण आला रे, कोण आला’ ‘शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा देत भुजबळांचे जोरदार स्वागत केले.

भुजबळ हे शिवसेनेत जाणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. पण यात अजून रंगत येत असल्याचे दिसत आहे. मी येवल्यातूनच विधानसभा लढवणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले. त्यांनी यावेळी शिवसेनेच्यावतीवने बसवलेल्या गणपतीला भेट दिली आणि भुजबळांना भगवी शाल घालत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत येण्याची विनंतीसुद्धा केली आहे.

यावेळी भुजबळ म्हणाले, माझ्याच हाताने या शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन झाले होते. त्यांनी अशाप्रकारे शिवसेनेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच निवडणूक येवला मतदार संघातून लढवणार असल्याचे जाहीर केले. पण त्यांनी कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. काही शिवसैनिक भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला विरोध करत असले तरी भुजबळांना काही शिवसैनिक समर्थन देत असल्याचे दिसून येत आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी भुजबळांनी मी जिथे आहे तिथे मला राहू द्या, असे म्हटले होते. मात्र, आजच्या त्यांच्या प्रतिक्रियेमुळे भुजबळांच्या सेना प्रवेशाच्या विषयाला अजून तरी पूर्ण विराम मिळाला नाही असेच म्हणता येईल.

Leave a Comment