व्हर्जिनिटीबाबत प्रश्न विचारणाऱ्याला एलियाना डिक्रुझने चांगलेच झापले


सेलिब्रिटींना ट्रोल करण्यासाठी सोशल मीडिया हे सध्या सहज माध्यम झाले आहे. पण आपल्या आगाऊ चाहत्यांना सेलिब्रिटींनी सडेतोड उत्तर दिले, की याच कलाकारांना डोक्यावर देखील घेतले जाते. असाच काही आगाऊपणा करत बॉलिवूड अभिनेत्री एलियाना डिक्रुझला तिच्या एका चाहत्याने ‘व्हर्जिनिटी’विषयी प्रश्न विचारला. पण एलियानाच्या उत्तरामुळे त्या चाहत्याची बोलतीच बंद झाली.

नुकतेच इन्स्टाग्रामवरील प्रश्नोत्तराच्या माध्यमातून एलियानाने चाहत्यांशी संवाद साधला. तिला तिच्या चाहत्यांनी आवडीनिवडी, लाईफस्टाइल, छंद याविषयी काही प्रश्न विचारले. या प्रश्नांना एलियानाने दिलखुलासपणे उत्तरे दिली. पण त्यापैकी एक चाहता भलताच आगाऊ निघाला. त्याने एलियानाच्या वैयक्तित आयुष्यात डोकावणारा प्रश्न विचारला. ‘वयाच्या कितव्या तू व्हर्जिनिटी गमावलीस?’ असा प्रश्न त्या चाहत्याने विचारला होता.

हा प्रश्न एलियानाला रुचला नसल्याचे साहजिकच आहे. त्याकडे एखाद्या अभिनेत्रीने दुर्लक्षही केले असते. पण काही चाहत्यांच्या या वृत्तीला चाप बसावी, म्हणून हा प्रश्न तिने शेअर करण्याचा पर्याय निवडला. ‘वॉव.. दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यात नाक खुपसण्याची तुला भारी हौस दिसते. तुझी आई यावर काय म्हणणार?’ असे उत्तर एलियानाने दिले.

एलियानाला बऱ्याचदा बॉडी-शेमिंगचाही सामना करावा लागला. मात्र प्रत्येक वेळी तिने बेधडक उत्तर देत ट्रोलर्सना गप्प केले होते. ‘बर्फी’ चित्रपटातून एलियानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले, तरी ती त्याआधी कन्नड, तामिळ आणि तेलुगू चित्रपटात गाजली होती. तिने त्यानंतर मै तेरा हिरो, रुस्तम, मुबारकां, बादशाहो, रेड यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ती लवकरच अनिस बजमीच्या ‘पागलपंती’ या विनोदी चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये अनिल कपूर, जॉन अब्राहम, अर्शद वारसी, पुलकित सम्राट, क्रिती खरबंदा अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Leave a Comment