मुंबई लोकल : स्टंटबाजी करणाऱ्यांना भोगावी लागेल पाच वर्षांची शिक्षा


मुंबई – मायानगरी मुंबईची जीवन वाहिनी अशी ओळख असणाऱ्या लोकलची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून काही स्टंटबाज करत आहेत. हे स्टंटबाज रेल्वे प्रवासादरम्यान स्टंट करतात ज्यामुळे इतर सहप्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण होतो. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन या स्टंटबाजांना चाप लावण्यासाठी सज्ज झाले आहे. रेल्वे, अथवा मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना यापुढे कोणी स्टंटबाजी केल्यास रेल्वे सुरक्षा दल त्यावर कडक कारवाई करणार आहे. त्याचबरोबर अशा स्टंटबाजांना तब्बल पाच वर्षांची शिक्षाही ठोठावली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा दल ही कारवाई शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कलमानुसार करणार आहे.

रेल्वे प्रवास, अथवा मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुण, तरुणी यांचा समावेश असतो. काही अल्पवयीन मुलेही अनेकदा असे स्टंट करताना दिसतात. कधी गर्दूले, फेरीवाले, दारुडे, नाशापाणी करुन प्रवास करणारे प्रवासी, बेकार तरुण-तरुण तरुणी, 15 चे 30 वर्षे वयोगटातील मुले-मुली आदी मंडळींचा या स्टंटबाजांमध्ये प्रामुख्याने समावेश दिसतो.

रेल्वे प्रवास, अथवा लोकल गाडीतून प्रवास करताना प्रामुख्याने गाडीच्या दरवाजाजवळ उभे राहणे, दरवाजातील खांबाला एक हात पकडून दुसऱ्या हाताने रुळाशेजारील वीजेच्या खांबांना स्पर्श करणे. पाय घासून जाताना पायानेच अन्य प्रवाशाला स्पर्श करणे, फलाटावरील प्रवाशाला हाताने मारणे, चालत्या किंवा उभ्या असलेल्या काढीच्या छतावर उभे राहणे, रेल्वे रुळावर उभे राहून सेल्फी काढणे, रेल्वे रुळावर टीक टॉक व्हिडिओ बनविणे, गाडी स्टेशनदरम्यान उभी असताना उडी मारुन बाजूच्या गाडीत जाणे, समोरुन येणाऱ्या दुसऱ्या गाडीतील प्रवाशांवर हातातील वस्तू फेकणे, अशा प्रकारचे ही मंडळी स्टंट करत असतात.

कलम 153 अन्वये रेल्वे सुरक्षा दल स्टंटबाजांवर कारवाई करणार आहेत. या कलमांचा वापर प्रवाशांच्या जीविताला हेतुपुरस्सर धोका उत्पन्न करणे. तसेच, स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालणे आदी गोष्टींना आळा घालण्यासाठी केला जातो. या आधी या कलमात स्टंट करणाऱ्या व्यक्तीला सध्या केवळ दंड आकारण्याची किंवा एक ते तीन महिन्यांपर्यंत शिक्षा भोगण्याची तरतूद होती. पण या नव्या कलमानुसार आता दोषी व्यक्तीस पाच वर्षे तुरुंगवास भोगावा लागतो. या नव्या कलमात तसा उल्लेख आहे.

Leave a Comment