काँग्रेसच्या आणखी एका नेत्याची ईडीकडून शिकार


बंगळुरू – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के शिवकुमार यांना दिल्लीतून अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए) अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. ते कर्नाटकचे माजी मंत्री होते.

ईडीने डी. के शिवकुमार यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी समन्स बजावले होते. ईडीने गेल्या वर्षी त्यांच्या विरूद्ध आर्थिक गैरव्यवहार केल्याबाबत प्रकरण दाखल केले होते. शिवकुमार यांच्याविरूद्ध कर चोरी, हवाला अशी प्रकरणे दाखल करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. ईडीकडून त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे.

३१ ऑगस्ट रोजी त्यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी दिल्ली येथे बोलविले होते. ईडीतर्फे रात्री ६ ते ११ वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीला आपण सहकार्य करित असल्याचे त्यांनी सांगितले होते. २०१८ मध्ये ईडीकडून डी.के शिवकुमार यांना नोटीस बजावण्यात आली होती. पण चौकशीला हजर न राहण्याची सूट शिवकुमार यांनी मागितली होती. याबाबत ईडीने त्यांची मागणी फेटाळल्यानंतर या प्रकरणी त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, तेथे सुद्धा न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली होती.

Leave a Comment