अचानक व्यायाम बंद केल्याने शरीरावर होऊ शकतात दुष्परिणाम

gym
आजच्या काळामध्ये शारीरिक स्वास्थ्याबद्दल लोकांचा दृष्टीकोन बदलत असून, अधिकाधिक व्यक्ती स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा निग्रह करताना दिसतात. याची तयारी म्हणून एखाद्या जिमचे सभासदत्व घेतले जाते, किंवा सायकलिंग, धावणे अश्या सारखे व्यायामप्रकार अवलंबले जातात. व्यायामाची सुरुवात तर चांगली होते, पण फार कमी व्यक्ती व्यायामाचा निग्रह टिकवून धरताना दिसतात. बहुतेक जण व्यायामाला उत्साहाने सुरुवात करतात खरी, पण काही काळानंतर त्यांचा हा उत्साह मावळतो. वेळेचा अभाव, कामाच्या डेडलाईन्स, सातत्याने करायला लागणारा प्रवास, कौटुंबिक जबाबदाऱ्या अश्या या ना त्या कारणांमुळे व्यायाम मागे पडत जातो. पण अश्या वेळी एका गोष्टीकडे लक्ष देणे अगत्याचे ठरते. ज्याप्रमाणे व्यायाम सुरु केल्यानंतर शरीरामध्ये काही चांगले बदल घडून येताना आपल्याला दिसतात, त्याचप्रमाणे अचानक व्यायाम करणे बंद केले, तर त्याचे काही दुष्परिणामही आपल्याला काही काळानंतर दिसून येऊ लागतात.
gym1
आरोग्यतज्ञांच्या मते नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींनी अचानक व्यायामाला सुट्टी दिल्याने काही आठवड्यांच्या अवधीतच त्यांच्या शरीरामध्ये बदल घडून येत असतात. अश्या व्यक्तींचे शरीर हळू हळू शिथिल पडू लागते. त्यांचे स्नायू आखडू लागतात. वर्कआउट करणे सोडल्यानंतर केवळ एक आठवड्याच्या अवधीतच शरीराची ‘मॅक्झिमम ऑक्सिजन कन्झंप्शन’ ची पातळी खालावते. नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांच्या स्नायूंना व्यायामासाठी अधिक प्राणवायूची आवश्यकता असते. व्यायाम करणे सोडल्याने ही पातळी खालावते. त्यामुळे नियमित व्यायामाअंतर्गत एखादी व्यक्ती, एखादे ठराविक अंतर, ठराविक वेळेमध्ये सहज पार करत असताना, व्यायाम सोडल्यानंतर प्राणवायूची पातळी खालावल्याने, हेच अंतर पार करण्यासाठी जास्त अवधी लागू लागतो.
gym2
व्यायम करणे सोडल्यानंतर तीन ते चार आठवड्यांच्या कालावधीत स्नायूंची शिथिलता अधिकाधिक वाढू लागते, आणि शरीरातील फॅट सेल्सचे प्रमाणही वाढू लागते. त्याचप्रमाणे शरीर सुस्त पडू लागते, वजन वाढू लागते, पचनक्रियाही विस्कळीत होऊ शकते. याचा परिणाम झोपेवरही होऊ शकतो. म्हणूनच दररोज कमीतकमी पंचेचाळीस मिनिटांचा व्यायाम, आठ ते दहा तासांची झोप, आणि संतुलित आहार या गोष्टी शरीर निरोगी ठेवण्यास आवश्यक आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment