या पठ्ठ्याने अक्षय कुमारला भेटण्यासाठी ९०० किमी केला पायी प्रवास


आपल्यापैकी अनेकांना आपल्या आवडत्या सेलिब्रेटीला भेटण्याची आवड असते, त्यातच त्यांना भेटण्यासाठी कोण काय करेल याबाबत काही नेम नाही. असाच काहीसा प्रकार सध्या बॉलीवूडमध्ये घडला आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला भेटण्यासाठी त्याच्या चाहत्याने तब्बल ९०० किलोमीटरचा प्रवास पायी पार केला आहे.

गुजरातमधील द्वारका शहरात अक्षय कुमारचा हा चाहता राहणारा आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्या भेटण्यासाठी द्वारका ते मुंबई चक्क ९०० किलोमीटरचा त्याने प्रवास पायी केला आहे. या चाहत्याचे नाव परबत असे असून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर परबतचा व्हिडीओ अक्षय कुमारने शेअर केला आहे.


अक्षय कुमारने व्हिडीओ शेअर करत माझी आज परबतशी मुलाखत झाली. मला तो भेटण्यासाठी ९०० किलोमीटर चालत द्वारकेहून आला आहे. हा १८ दिवसांचा प्रवास त्याने मला रविवारी भेटण्यासाठी केला आहे. असे नियोजन आणि धैर्याने काम आपल्या युवा पिढीने केले तर त्यांची स्वप्नपूर्ण होतील. त्यांना मग कुणीही अडवू शकत नसल्याचे त्याने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले होते.


परबत हा अक्षयचा खूप मोठा चाहता आहे. अक्षयला भेटण्यासाठी त्याने ९०० किलोमीटरचा प्रवास पायी केला आणि तो सकाळी अक्षय कुमारला त्याच्या निवासस्थानी जाऊन भेटला. अक्षयला आपल्यावरचे चाहत्यांचे प्रेम पाहून आनंदच झाला पण दुसरीकडे अक्षयने चाहत्यांना असे धाडस करु नका अशी विनंती देखील केली आहे.

दुसरे ट्विट करत अक्षय कुमारने तुम्हाला भेटल्यावर मला नेहमी आनंद होतो आणि मी तुमच्या या प्रेमासाठी कायम आभारी आहे. पण तुम्हाला मी विनंती करतो की असे काही करत जाऊ नका. तुमचा वेळ, तुमची ताकद तुमचे आयुष्य सुधारण्यासाठी वापरा. त्यातच माझा आनंद आहे. परबतला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा, असे म्हटले आहे.

Leave a Comment