कोका कोलाचे सेवन केल्यानंतर एक तासाच्या अवधीत शरीरामध्ये होतात असे बदल.

coke
लठ्ठपणा ही समस्या समस्त जगालाच भेडसावते आहे. अनेक प्रयत्न करून, डॉक्टरांचा सल्ला घेऊनही शरीरातील फॅट सेल्स, म्हणजेच चरबी म्हणावी तशी कमी होत नाही. यामागे शरीरशास्त्र, किंवा आपले शरीर नेमके कसे काम करीत असते, हे जाणून घेणे अगत्याचे आहे. आपल्या शरीराला ग्लुकोज अतिशय प्रिय आहे. ग्लुकोजपासून मिळालेली ऊर्जा लवकर खर्च होत असते. पण ग्लुकोज ही शरीराची मोठी समस्या नसून, सुक्रोजमध्ये असणारे फ्रुक्टोज ही खरी समस्या आहे. हे फ्रुक्टोज लिव्हरमध्ये साठत असते आणि येथूनच याचे रूपांतर ‘बॅड फॅटस्’ मध्ये होत असते. तसेच फ्रुक्टोज आपल्या मेंदूला, खाणे किंवा पेयाचे सेवन करण्याचे थांबविण्याबद्दल कोणताही संकेत देत नाही. म्हणूनच सोडा किंवा कोका कोला कितीही प्रमाणामध्ये सेवन करणे फारसे कठीण नसते.
coke1
फ्रुक्टोज मोठ्या प्रमाणावर प्रोसेस्ड अन्नपदार्थांमध्ये असते. अगदी ‘लो फॅट’ प्रोसेस्ड अन्नपदार्थांमध्ये देखील हे असते. यामागे मुख्य कारण असे, की जर फ्रुक्टोज या पदार्थांमध्ये नसेल, तर या पदार्थांची चव म्हणावी तितकी चांगली लागणार नाही. फ्रुक्टोज फळांमध्ये देखील नैसर्गिक रित्या असतेच, पण त्याच्या जोडीने निसर्गाने फळांमध्ये फायबरही मुबलक मात्रेमध्ये दिले असल्याने फळांच्या सेवनाने शरीरामध्ये फ्रुक्टोज जास्त मात्रेमध्ये अवशोषित होत नाही. त्यामुळे फ्रुक्टोज आणि तत्सम अॅडीटिव्हज असलेल्या प्रोसेस्ड अन्नपदार्थांचे सेवन वर्ज्य करणे हे वजन घटविण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. अश्या प्रकारच्या अन्नपदार्थांपैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे कोका कोला, किंवा तत्सम पेये.
cok2
कोका कोलाचा एक कॅन (२०० मिली) सेवन केल्याच्या सहा मिनिटांमध्ये सुमारे दहा चमचे साखर शरीरामध्ये जात असते. खरे तर इतकी साखर आपले शरीर अवशोषित करू शकत नाही, पण या पेयांमध्ये असलेल्या फॉस्फोरिक अॅसिड सारख्या अॅडीटीव्हजमुळे या पेयाचा गोडवा कमी होत असतो. पेय सेवन केल्याच्या वीस मिनिटांच्या नंतर शरीरातील इंस्युलीनची पातळी वाढू लागते. शरीरामध्ये साखरेची मात्रा प्रमाणाबाहेर वाढल्याने ही साखर लिव्हरमध्ये साठविली जाते आणि त्याचे रूपांतर चरबीमध्ये होण्यास सुरुवात होते. कोका कोला आणि तत्सम पेयांमध्ये कॅफीन असते. या पेयाच्या सेवनानंतर साधारण चाळीस मिनिटांनी शरीरामध्ये हे कॅफीन अवशोषित होऊन डोळ्यांची बुबुळे ‘डायलेट’ होऊ लागतात, रक्तदाब वाढतो आणि फॅट सेल्सचे उत्पादन वाढविले जाते. त्यामुळे शरीरामध्ये अचानक ऊर्जा, उत्साह जाणवू लागतो.
coke3
पेय सेवन केल्याच्या साधारण एक तासानंतर त्यामध्ये असलेल्या कॅफीनमुळे लघवीची भावना होण्याचे प्रमाण वाढते आणि लघवीद्वारे कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर बाहेर टाकले जाते. त्यामुळे अन्नसेवनातून जे कॅल्शियम वास्तविक हाडांना मिळायला हवे, ते लघवीवाटे बाहेर टाकले जात असते. तसेच या लघवी वाटे इलेक्ट्रोलाईट्स, सोडियम क्लोराईड, पाणी आणि मॅग्नेशियमही बाहेर टाकले जात असते. साधारण एका तासाच्या अवधीनंतर कॅफीनचे परिणाम कमी झाल्यानंतर शरीरामध्ये पुन्हा शैथिल्य येतेच, शिवाय शरीरातील अनेक पोषक घटकही लघवीवाटे बाहेर टाकले जात असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment