वजन घटवा आयुर्वेदाच्या सल्ल्याने

weight
वजन घटविणे ही अनेकांसाठी मोठी कसोटी असते. अनेक तऱ्हेची डायट करून, अनेक तऱ्हेचे व्यायाम करूनही मनासारखे परिणाम पहावयास मिळतातच असे नाही. अनेकदा अश्या फॅड डायटस् मुळे वजन कमी होते खरे, पण हे तात्पुरते असते. या डायटमध्ये थोडा फार जरी बदल झाला किंवा अनियमितता आली, तर घटलेले वजन पुन्हा वाढू लागते. अनेकांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे, वारंवार प्रवास करावा लागत असल्यामुळे, किंवा तत्सम कारणांमुळे आहारनियमांचे पालन करणे आणि त्याला व्यायामाची जोड देणे जमतेच असे नाही. अश्या व्यक्तींनी आयुर्वेदाच्या सल्ला आजमावून पाहण्याचा विचार अवश्य करावा. वजन घटविण्याच्या दृष्टीने फायदेशीर असे काही नियम आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत.
weight1
सकाळचा नाश्ता हे आपले दिवसभरातील सर्वात महत्वाचे भोजन असते. या भोजनामधून दिवसभर सक्रीय राहण्याची ताकद आपल्याला मिळत असते. आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार सकाळचा नाश्ता हा प्रथिनांनी परिपूर्ण असायला हवा. अश्या प्रकारच्या नाश्त्यामुळे दिवसभर कार्यरत राहण्यासाठी आवश्यक ऊर्जा शरीराला मिळते आणि शरीराची चयापचय शक्तीही उत्तम राहते. शरीरची चयापचय शक्ती जितकी चांगली, तितकी शरीराची कॅलरीज खर्च करण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, पनीर, अॅव्होकाडो, उसळी, मोडवलेली कडधान्ये यांचा समावेश करावा.
weight2
आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार केव्हाही भोजन करताना किंवा काहीही खाताना प्रत्येक घास अतिशय सावकाश चावून खाणे महत्वाचे असते. असे केल्याने तोंडातील लाळ अन्नामध्ये मिसळून अन्नातील पोषक घटकांचे अवशोषण शरीरामध्ये होते. तसेच प्रत्येक घास सावकाशीने खाल्ल्यानंतर पोट भरल्याचा संदेश मेंदूकडून अधिक लवकर दिला जातो. ज्या व्यक्तींना भरभर जेवण्याची सवय आहे, त्यांना अन्न किती प्रमाणामध्ये खाल्ले जाते याचा अंदाज घेता येत नाही, शिवाय अन्न व्यवस्थित चावले न घेल्याने पचनक्रियाही बिघडण्याची शक्यता अधिक असते.
weight3
जेवताना काही लोकांना सतत पाणी पिण्याची सवय असते. पण आयुर्वेदानुसार पाणी भोजनाच्या आधी अर्धा तास प्यायले जावे, किंवा भोजनानंतर अर्ध्या तासाने प्यायले जावे. भोजनाच्या दरम्यान पाणी पिण्याची गरज भासली तर काही घोट पाणी प्यावे. एरव्ही पाणी पिताना देखील उभे राहून न पिता बसून प्यावे. आपले भोजन षड्रस युक्त असावे. तसेच यामध्ये कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, यांचा समावेश अधिक असावा. गव्हाच्या पोळीऐवजी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीच्या सेवनाला प्राधान्य दिले जावे. जेवणाच्या वेळा निश्चित असाव्यात, आणि या वेळांच्या व्यतिरिक्त मध्ये मध्ये काही खाणे टाळावे.

Loading RSS Feed
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment