पनीर भुर्जी वापरताना त्यासोबत हा पदार्थ वापरल्याने भुर्जी बनते अधिक पौष्टिक


आहारामध्ये इतर पौष्टिक तत्वांच्या सोबत प्रथिने असणे अत्यावश्यक असते. प्रथिने आपल्या शरीराचे बिल्डींग ब्लॉक असून, सर्व अवयव निरोगी राहण्याच्या दृष्टीने आणि स्नायूंना बळकटी देणारे असे हे तत्व आहे. जी मंडळी मांसाहारी आहेत, त्यांना शाकाहारी पदार्थांच्या सोबतच चिकन, मासे, अंडी, दुध, यांच्याद्वारे प्रथिने मिळविता येतात. मात्र शाकाहारी व्यक्तींना आपल्या आहारामध्ये हे पदार्थ समाविष्ट करता येत नसल्याने त्यांना प्रथिने, दुध, व दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या इत्यादींच्या मार्फत मिळवावी लागतात. यामध्ये सर्वात लोकप्रिय पर्याय पनीरचा असून, अनेक प्रकारे पनीर आपल्या आहारामध्ये समाविष्ट करता येते. किंबहुना पनीर बनविताना दुध फाटल्यानंतर जे पाणी गाळून काढले जाते, तेही पाणी (whey) प्रथिनांनी परिपूर्ण असते. पनीरचा वापर भाजी, सॅलडमध्ये केला जातोच, त्याशिवाय ग्रिल्ड पनीर, कोफ्ते यासारखे पदार्थही अतिशय लोकप्रिय आहेत.

आवश्यक ती प्रथिने मिळविण्यासाठी पनीर अतिशय उपयुक्त असून, पनीर भुर्जी, हा बनविण्यास अतिशय सोपा आणि कमी तेल वापरून बनविला जाणारा पदार्थ असल्याने हा अतिशय लोकप्रिय ‘ब्रेकफास्ट ऑप्शन’ आहे. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मंडळींसाठी देखील हा पर्याय अतिशय उत्तम आहे. पनीर मध्ये प्रथिने मुबलक मात्रेमध्ये असल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते आणि त्यामुळे वारंवार होणारी भुकेची भावना कमी होऊ लागते. पनीर भुर्जीच्या माध्यमातून प्रथिने मिळवितानाच, यामध्ये आणखी एक पदार्थ मिसळला, तर भुर्जी अधिक चविष्ट बनतेच, शिवाय अधिक पौष्टिकही बनते, हा पदार्थ म्हणजे मटार.

मटारात पोषणमूल्ये मुबलक मात्रेमध्ये असून, यामध्ये क व के जीवनसत्व, मँगनिझ, आणि फोलेट आहे. यामध्ये प्रथिने आणि फायबरही मुबलक मात्रेमध्ये आहेत. पनीर भुर्जी मध्ये मटाराचा वापर केल्याने या पदार्थांची पौष्टिकता वाढतेच, शिवाय या पदार्थाचा ‘फायबर कोशंट’ही वाढतो. त्यामुळे पोट लवकर भरते, व पचनशक्ती सुधारते, जी वजन घटविण्यासाठी आवश्यक असते. पनीर भुर्जीमध्ये मटार घालायचे झाल्यास मटाराच्या कोवळ्या शेंगा सालीसकट घातल्या जाऊ शकतात, किंवा मटाराचे दाणे इतर भाज्यांसोबत परतून भुर्जीमध्ये घातले जाऊ शकतात. मात्र भुर्जीमध्ये फायबरची मात्रा वाढवायची असल्यास मटाराच्या कोवळ्या शेंगा सालीसकट घालण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment