पोहण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये जात असल्यास घ्या काळजी


पोहणे किंवा स्विमिंग ही अॅक्टिव्हिटी, संपूर्ण शरीराला उत्तम व्यायाम घडविणारी म्हणून ओळखली जाते. यामध्ये आपले हात, पाय, पाठ, पोट या सर्व ठिकाणचे स्नायू वापरले जात असतात. भरपूर कॅलरीज खर्च करविणारा, स्नायूंना बळकटी देणारा आणि शरीर सुडौल बनविणारा असा हा व्यायाम आहे. आजकाल मोठमोठ्या शहरांपासून लहान लहान शहरांमध्येही जलतरणतलावाची सुविधा सहज उपलब्ध असते. शिवाय भारतातले हवामान, वर्षातले कडाक्याच्या थंडीचे काही दिवस सोडले, तर एरव्ही कधीही पोहायला जाता यावे असे असल्याने हा व्यायामप्रकार कायमच लोकप्रिय ठरत आला आहे. मात्र पोहण्यासाठी जलतरणतलावामध्ये जाण्यापूर्वी तेथील पाणी स्वच्छ, फिल्टर केलेले असल्याची खबरदारी घेणे अतिशय आवश्यक असते. अन्यथा या दूषित पाण्याच्या मार्फत अनेक विकार उद्भवू शकतात.

आपण जात असू त्या जलतरणतलावाचे पाणी दूषित असल्यास डोळ्यांची इन्फेक्शन आणि त्वचेवर येणाऱ्या रॅशेस, या सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या समस्या आहेत. जलतरणतलावाच्या पाण्यामध्ये भरपूर क्लोरीन असल्यास हे पाणी संपूर्णपणे स्वच्छ आणि जंतूविरहित असते हा गैरसमज आहे. किंबहुना अत्यधिक क्लोरीन मिसळलेल्या पाण्यामध्ये तुम्ही जितका अधिक काळ रहाल, तितका संक्रमणाचा धोका जास्त असतो. एकदा या पाण्यातील जंतूंमुळे संक्रमण होऊन त्वचेवर पुरळ येऊ लागले, तर हे पुरळ संपूर्ण नाहीसे होण्यास किमान आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो.

पाण्यामध्ये पोहत असताना नाकामध्ये किंवा कानांमध्ये पाणी जाणे ही अतिशय सामान्य बाब आहे. हे पाणी जसे नाकात किंवा कानामध्ये शिरते, तसेच ते आपोआप बाहेरही पडते, पण कानाच्या आत इयर कॅनालमध्ये जर हे पाणी साचून राहिले, तर त्या ठिकाणी सततच्या ओलसरपणामुळे बॅक्टेरियांचे संक्रमण होऊ शकते. यालाच ‘स्विमर्स इयर’ असे ही म्हटले जाते. परिणामी कानामध्ये सूज येणे, कान दुखणे, किंवा कानात खाज सुटणे अश्या समस्या उद्भवू शकतात. यासाठी पोहणे संपल्यावर कान स्वच्छ कपड्याने कोरडे करणे अतिशय आवश्यक असते. जर कानामध्ये जास्तच पाणी शिरले असेल, तर कानापासून काही अंतरावर ब्लो ड्रायर, सर्वात कमी हीट सिटींगवर चालवून कान कोरडा होऊ द्यावा.

नव्याने पोहायला शिकणाऱ्या मंडळींच्या तोंडामध्ये पूलचे पाणी शिरून ते पाणी गिळले जाणे ही देखील सामन्य बाब आहे. मात्र हे पाणी जर दूषित असेल, तर त्या योगे डायरिया सारख्या समस्या उद्भविण्याची शक्यता असते. त्यामुळे पोहोत असताना पूलमधील पाणी गिळले जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक ठरते.

Leave a Comment